आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six People Dead In Same Family In Jeep Accident At Nagar District

अकोले तालुक्यात जीप दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले (अहमदनगर)- हळदी समारंभ आटोपून गावी परतत असताना अंबित धरणाजवळ जीप दोनशे फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा ठार, तर अन्य सहाजण गंभीर जखमी झाले. गुरुवारी (1 मे) सायंकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली.

जायनावाडी येथील धिंदळे कुटुंबीय नातेवाइकांसह जीपने लव्हाळी ओतूर येथे हळदी समारंभासाठी आले होते. कार्यक्रमानंतर पाचनईमार्गे ते जायनावाडीकडे जात होते. पाचनई ते अंबित रस्त्यावर अंबितजवळील डुक्कर घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी दोनशे फूट खोल दरीत कोसळली. जीप दरीत जात असताना चालकाने केलेल्या आरडाओरडीमुळे गाडीतील संजय धिंदळे (31), शरद धिंदळे (25) व दादाभाऊ धिंदळे (22) या युवकांनी गाडीबाहेर उड्या मारल्या. त्यामुळे ते या अपघातातून बचावले. बचावलेल्या एका युवकाने पोलिस पाटलाला, तसेच राजूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरीत जीप कोसळल्याचे समजताच अंबितमधील अनेक मदतीसाठी धावले. गावकर्‍यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी राजूरला पाठवले.
पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मृतदेह बाहेर काढले. चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. किसन धिंदळे या जखमीचा राजूरकडे नेत असताना मृत्यू झाला. राजूरमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना नाशिकला पाठवण्यात आले. नाशिककडे जात असताना वाटेतच संजय लहामटे यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेत मारुती धिंदळे (35), किसन धिंदळे (45), विमल धिंदळे (40), सोनाली धिंदळे (13, सर्व जायनावाडी, ता. अकोले), अंकुश वायळ (40, आंबित, ता. अकोले), संजय होनाजी लहामटे (27, लव्हाळी ओतूर, ता. अकोले) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे.