आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरात पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा, शंभरावर गुरे ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - शहरातील कत्तलखान्यावर पोलिसांनी रविवारी छापा टाकून शंभराहून अधिक जनावरे ताब्यात घेतली. कत्तल केलेल्या जनावरांची संख्यादेखील मोठी असल्याचे पुढे आले आहे. कत्तलीसाठीची जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वात मोठी कारवाई ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात गोमांस पकडल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यातील बहुतांश ठिकाणी जाणारे मांस संगमनेर येथून जात असल्याचे पुढे आले होते. निरीक्षक नितीन चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी बाहेरगावी एका वाहनातून जाणारे मांस समनापूर परिसरात ताब्यात घेतले होते. मात्र, त्यानंतरही शहरात गोहत्या सुरूच असल्याची माहिती मिळाल्यानंतर चव्हाण यांनी पथकासह भारतनगर परिसरातील कत्तलखान्यावर सायंकाळी छापा टाकला. पथकात निरीक्षक चव्हाण, सहायक निरीक्षक शिवाजी पाळदे, उपनिरीक्षक अन्सार इनामदार, अन्सार शेख यांच्यासह २२ जण सहभागी होते. या कत्तलखान्यात पोलिसांना अनेक कापलेली जनावरे आढळली. शंभरावर लहानमोठी जनावरे ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षितस्थळी नेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. संगमनेरचे तत्कालीन निरीक्षक श्याम सोमवंशी यांची श्रीगोंदे येथे बदली झाल्यानंतर त्यांनी तेथे कारवाई करून कत्तलीसाठीची जनावरे ताब्यात घेतली होती. संगमनेरमध्ये अशी कारवाई का होत नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच चव्हाण यांनी ही कारवाई केल्याने प्राणिमित्रांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

स्लॉस्टर हाऊसमागील बाजूच्या परिसरात कारवाई
संगमनेरमध्ये नगरपालिकेच्या मालकीचे स्लॉटर हाऊस उभारण्यात आले आहे. तेथे जनावरे कापली जात नसल्याची माहिती सभागृहात देण्यात आली होती. मात्र, गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतरही संगमनेरात गोहत्या होत असताना पालिकेच्या सभेत हा विषय उपस्थित झाल्यानंतरही याबाबत नगरसेवकांनी मौन बाळगत पोलिसांवर जबाबदारी झटकल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी'ने गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध केले होते. स्लॉटर हाऊसच्या मागच्या बाजूलाच असलेल्या परिसरात पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे पालिका प्रशासनाचेही या व्यवसायाला अभय आहे काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...