आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टपर्‍यांच्या वाहतुकीतही गैरव्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गटई कामगारांसाठी आलेल्या टपर्‍यांच्या दर्जाबाबतच हा गैरव्यवहार र्मयादित नाही, तर या टपर्‍या प्रत्येक तालुक्यात पाठवतानाही गडबडी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी टपर्‍या पाठवताना त्या चक्क महिंद्रा पिक-अपमध्ये पाठवल्याचे दाखवण्यात आले. मुळात या गाडीत टपर्‍यांचे सुटे भाग बसूच शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात 430 टपर्‍यांची मागणी असताना प्रत्यक्षात 417 टपर्‍या नगरमध्ये उतरवण्यात आल्या. त्या कमी असल्याचे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांचे पत्रही आहे. मात्र, किती टपर्‍या आल्या याचा चलनांवरील आकडा पाहिला, तर तो 402 च भरतो. म्हणजे यातील 15 टपर्‍यांचा हिशेब लागत नाही. सरकारी किमतीनुसार या टपर्‍यांची रक्कम पावणेसात लाख रुपये होते.

लाभार्थींची संख्या याहून अधिक असल्याचे समाज कल्याण विभागाचे म्हणणे आहे. मात्र, लाभार्थींची फक्त 345 जणांची यादीच कागदांत आढळते. जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणी टपर्‍या उतरवताना अनेक गोंधळ झाले आहेत. कोपरगावला 51 टपर्‍यांची मागणी होती. त्यानुसार 25 मार्च 2013 रोजी तितक्या टपर्‍या उतरवल्याचे चलन आहे. मात्र, तेथे एकही टपरी उतरवल्याची नसल्याची नोंद समाज कल्याण विभागाच्या कागदपत्रांत आढळते. उलट, कोपरगावात एकही टपरी आली नसल्याची पत्रे समाज कल्याण विभागाच्या सहआयुक्तांनी 6 एप्रिल व सात जून रोजी पाठवल्याचे स्पष्ट होते. हे गौडबंगाल स्पष्ट होत नसल्याचे विजय घासे यांचे म्हणणे आहे. असाच प्रकार शेवगावच्या बाबतीत घडला आहे. तेथे 31 टपर्‍या उतरवल्याची समाज कल्याण विभागाच्या पत्रात नोंद आहे. मात्र, त्याचे चलन उपलब्ध नाही. टपर्‍या तालुक्यांच्या ठिकाणी पाठवताना एक मोठा गोंधळ दिसतो. एकाच दिवशी एकाच वाहनाने कर्जत, जामखेड व राहुरीला अनुक्रमे 16, 3, 7 अशा टपर्‍या पोहोचवल्याची नोंद दिसते. नगर शहराच्या टपर्‍या चक्क नेवासे येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात उतरवल्याचे कागदोपत्री दिसते. र्शीगोंद्याच्या टपर्‍या कर्जत तालुक्यातील गायकरवाडीत उतरवल्याचीही कागदपत्रे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या टपर्‍या तालुकानिहाय कोठे उतरवायच्या हे सरकारच्या पत्रात स्पष्टही करण्यात आले आहे, तरीही हा सर्व गोंधळ झाला आहे.

टपर्‍यांत कोणताही गैरव्यवहार नाही
सरकारी योजनेनुसार आम्ही लाभार्थींची यादी पाठवतो. त्यानुसार वस्तूंचा पुरवठा होत असतो. काही ठिकाणी गटई कामगारांच्या टपर्‍या उतरवण्याचे काम व्यवस्थित न झाल्याने त्या खराब असल्याचा काही कार्यकर्त्यांचा समज झाला. त्यांनी तशी तक्रार केल्यानंतर आम्ही तसा पत्रव्यवहारही संबंधितांशी केला आहे. मात्र, यात काहीही गैरव्यवहार झाला नाही. कार्यकर्त्यांच्या तक्रारी गैरसमजुतीतून झालेल्या आहेत.’’ बी. व्ही. देव्हारे, लिपिक, समाज कल्याण विभाग.

हा सर्व गैरव्यवहारच
टपर्‍या उतरवल्याची चलने पाहता शेवटच्या 85 टपर्‍या नगर जिल्ह्यात कोणत्या वाहनाने आल्या, त्याचा क्रमांक आढळून येत नाही. त्यांचा ताबा कोणी घेतला याची स्वाक्षरीही त्याबाबतच्या तीन चलनांवर नाही. टपर्‍यांच्या वितरणातील हा गोंधळ म्हणजे गैरव्यवहारच आहे. या गोंधळात काही टपर्‍या गायब करण्यात आल्याचा संशय निर्माण होतो. स्पष्ट सूचना असताना असे घडण्याचे कारणच काय? या निकृष्ट टपर्‍यांचे वितरण होऊ देणार नाही.’’ विजय घासे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ.