आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतजमिनीचे स्मार्टफोनवर मॅपिंग, अचूक निदान होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शेतकऱ्यांना पीक विमाअंतर्गत नुकसानभरपाई देण्यासाठी ‘पंतप्रधान कृषी विमा याेजने’त दूरसंवेदन व ड्रोन विमानांच्या साहाय्याने नुकसानग्रस्त भागाचे मॅपिंग करण्याची पद्धत सरकारने अवलंबली अाहे. मात्र या तंत्रज्ञानाने मिळवलेल्या प्रतिमांचा प्रभावी वापर करण्यासाठी अाधी शेतीचे अचूक नकाशे बनवणे व नकाशांचे संगणकीकरण (डिजिटायझेशन) करणे तितकेच आवश्यक आहे. नगरचे डिजिटल नकाशातज्ज्ञ अभय कुलकर्णी यांनी  अत्यंत कमी खर्चात ही पद्धत विकसित केली आहे. तिचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना पीक विमा देताना सरकारला मदत हाेईल, असा त्यांचा दावा अाहे.  

नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करण्याची काेणतीही यंत्रणा  विमा कंपन्यांकडे नाही. त्यामुळे या कंपन्या सध्या कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगावर (नमुना पद्धत) अवलंबून आहेत. नुकसानाच्या वेळी प्रत्येक शेती क्षेत्राची तपासणी करून अहवाल तयार करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. सध्याच्या सरकारी पद्धतीत भरपाई मिळण्याचा कालखंड आठ ते दहा महिन्यांचा आहे. हा उशीर टाळण्यासाठी कुलकर्णी यांनी नवीन पद्धती विकसित केली आहे. त्यामुळे वरील सर्व यंत्रणांमध्ये सुसूत्रता येईल तसेच शेतकऱ्यांना अगदी तीन महिन्यांत  भरपाई मिळू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. गावालाच सर्व डिजिटल माहितीचे केंद्र बनवण्याची त्यांची कल्पना आहे. त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध हाेईल. अँड्रॉइड फोन वापरून हे मॅपिंग करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आहे.  

शेतकऱ्याला फायदा   
- शेतकऱ्यांना जमिनीच्या नकाशाबरोबरच मातीचा प्रकार, परीक्षण, आरोग्य, क्षारांचे प्रमाण, इतर रासायनिक घटक, पाण्याची उपलब्धता, सिंचनाचा प्रकार, मातीची पाणी धारण क्षमता ही सर्व माहिती जोडता येते. त्यामुळे या माहितीचे विश्लेषण करून शेतकऱ्याला योग्य तो सल्ला देता येतो.   
- वैयक्तिक दाव्यांच्या त्वरित मूल्यांकनासाठी नुकसानीची भौगोलिक व इतर आवश्यक माहिती गोळा करून थेट विमा कंपनीला सादर करता येते.   
- प्रशासकीय व तांत्रिक बाबींना लागणारा वेळ वाचून त्वरित मदत विमा कंपनीकडून प्राप्त करणे शक्य.  
- विमा कंपन्यांना पेरणी पश्चात कृषी क्षेत्राची वैधता तपासता येते तसेच सत्यापन करता येते. त्यामुळे बनावट दाव्यांना पायबंध बसू शकेल.   
- नमुना पद्धतीने गावातील सर्व शेती क्षेत्राचे पीक नुकसान ठरवण्यापेक्षा वैयक्तिक स्तरावर नुकसान ठरवणे शक्य होते.  

कसे होते मॅपिंग  
- गावाची गुगल सॅटेलाइट इमेज ऑफलाइन स्वरूपात फोनवर प्रस्थापित केली जाते.   
- त्याचाच आधार घेऊन सर्व शेती क्षेत्रे पॅन व झूमच्या साहाय्याने ओळखता येतात.   
- सोप्या पद्धतीने संबंधित शेती क्षेत्राच्या चार कोपऱ्यांवर बिंदू प्रस्थापित केले जातात.   
- या पद्धतीने शेती क्षेत्राचा डिजिटल नकाशा तयार होतो. त्यानंतर त्याला बाकीची सर्व माहिती जोडता येते.   
- अशा प्रकारे गावातील सर्व शेतीचा नकाशा स्मार्ट फोनवर तयार करता येतो.  
बातम्या आणखी आहेत...