आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर सर्पदंश झालेली एकही व्यक्ती दगावणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कृत्रिम श्वसनाची व्यवस्था असलेली आरोग्य केंद्रे, रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याची यंत्रणा आणि योग्य उपचार या तीन गोष्टी शक्य झाल्या, तर सर्पदंश झालेली एकही व्यक्ती दगावणार नाही, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. विजय सोनार यांनी "दिव्य मराठी'शी संवाद साधताना व्यक्त केले. डॉ. सोनार यांनी मागील पंधरा वर्षांत दोन हजारांहून अधिक सर्पदंश झालेल्यांना जीवदान दिले आहे.

सर्पदंशाने जगातील सर्वात जास्त मृत्यू भारतात होतात. ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त साप असताना तेथे सर्पदंशाने मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. याचे मुख्य कारण तेथे सर्पदंश झाल्यानंतर उपचारांची व्यवस्था अतिशय उत्तम आहे. अशा रुग्णांना तातडीने उपचार मिळतात, असे डॉ. सोनार म्हणाले.

आपल्या देशात २५० प्रकारचे साप आढळतात. त्यातील ५० प्रकारचे साप त्रासदायक आहेत. मात्र, ज्यांच्या दंशाने जीव जाऊ शकतो, असे केवळ पाच प्रकारचे साप आहेत. यातील एक समुद्रसाप असून अन्य चार प्रकारांमध्ये नाग, घोणस, फुरसे मण्यार यांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी सुमारे पन्नास हजार व्यक्ती सर्पदंशाने मरतात. महाराष्ट्रात हे प्रमाण तीन हजार आहे. सर्पदंश होणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे, असे डॉ. सोनार म्हणाले.
उन्हाळा आणि पावसाळ्यात साप चावण्याचे प्रमाण जास्त असते. प्रजननाचा हा काळ असतो, शिवाय पावसाचे पाणी बिळात गेल्याने साप बाहेर पडतात. शेतात काम करणार्‍यांना सर्पदंश जास्त प्रमाणात होतो. साप स्वत:हून कधीच हल्ला करत नाही. सापावर पाय पडल्याने किंवा कडबा उचलताना साप चावल्याच्या घटना जास्त आहेत. मण्यार मध्यरात्री १२ ते च्या दरम्यान भक्ष्याच्या शोधात घरात शिरून जमिनीवर झोपलेल्यांना चावतो. त्याचे दात इतके अणकुचीदार असतात, की बर्‍याचदा दंशाचा व्रणही दिसत नाही. पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू होऊन रुग्ण डॉक्टरकडे जातो, तेव्हा सर्पदंश झाल्याचे लक्षात येत नाही. सर्पदंश होताच वेळ वाया घालवता तातडीने रुग्णाला कृत्रिम श्वसन सुरू करून योग्य उपचार केले, तर जीव नक्की वाचतो. मागील चार वर्षांत माझ्याकडे आलेला एकही रुग्ण दगावलेला नाही, असे डॉ. सोनार म्हणाले.

थोडी काळजी घेतली, तर साप चावण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे सांगताना डॉ. सोनार म्हणाले, जमिनीऐवजी कॉट वापरावी, अनवाणी काम करू नये, गमबूट घालणे उत्तम. वैरण काढताना काठीचा वापर करावा. घराच्या शेजारी कचरा साचू देऊ नये, खरकटे दूर नेऊन टाकावे. अन्नधान्याची साठवणूक व्यवस्थित करावी, जेणेकरून उंदीर येणार नाही. उंदीर आले, तर सापांना निमंत्रणच मिळते.

प्रशिक्षण आवश्यक
सर्पदंशाचेत्यामुळे दगावण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याबरोबर दंश झाल्यावर तातडीने करावयाच्या गोष्टींबाबत प्रशिक्षण देणे अतिशय आवश्यक आहे. साप चावलेल्या रुग्णाची हालचाल कमीत कमी होईल हे पहावे. दंश झालेली जागा ब्लेडने कापू नये, हृदयाच्या दिशेने प्रेशर बँडेज बांधावे, तसेच अंधश्रद्धा दूर ठेवून कमीत कमी वेळेत रुग्णाला डॉक्टरकडे कसे नेता येईल, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे असते, असे डॉ. सोनार यांनी सांगितले.

त्यांचे वाचले प्राण
दीडवर्षापूर्वी नेवासेफाटा येथील तरुणाला चार ठिकाणी घोणस चावला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याला झटके येत होते. अतिशय गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्पदंशावरील लशीच्या (एव्हीएस) १७५ कुप्या त्याला द्याव्या लागल्या, तेव्हा त्याचे प्राण वाचले. काही दिवसांपूर्वी सर्पमित्र वाकचौरे यांनाही नागाने चावा घेतला होता. त्यांना एव्हीएसच्या १०० कुप्या द्याव्या लागल्या होत्या, असे डॉ. सोनार यांनी सांगितले.