नगर- तिच्या आईचं लग्न देवाशी लागलं, तिचंही लग्न देवाशी लावलं गेलं, पण आपल्या मुलीच्या वाट्याला हे भोग येऊ नयेत असं सांगणारी मुरळी सर्वांची मने हेलावून गेली.
मुरळीच्या आयुष्याच्या फरफटीचे दर्शन घडवणार्या लघुपटाने स्नेहालयाच्या युवा निर्माणतर्फे आयोजित लघुपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात झालेल्या या महोत्सवात 31 लघुपट दाखवण्यात आले. उद्घाटन माय सिनेमा चित्रपटगृहाचे संचालक रमेश वाबळे यांच्या हस्ते क्लॅप देऊन झाले. या महोत्सवाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात एक नवी संस्कृती जन्माला येत आहे. या माध्यमातून युवकांना ज्वलंत सामाजिक विषय मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे ते म्हणाले. महोत्सवाचे समन्वयक डॉ. सतीश राजमाचीकर, स्नेहालयचे सुवालाल शिंगवी, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, सुजाता वाबळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दादासाहेब शेळके दिग्दर्शित ‘मुरळी मी देवाची’ या लघुपटाने महोत्सवास प्रारंभ झाला. द्वंद, चाळीस फूट, धाडस, ती, आईने, व्हॉटस् अँप, अनुकरण, भंगारवाले, सहल, कुर्बान, हेडस् अँण्ड टेल्स, हु आय एम, वृत्ती, रुपया, पान 3, पाच रुपये, दादू, सेव्ह अवर प्लॅनेट, थेंबे थेंबे.., डोंगर्या पल्ल्याड, श्लोश वॉर, पाणी, विहीर गल्ली, कर भला.., कट द रोप, डोनेशन बॉक्स, संस्कार इटस मी, गुडमॉर्निंग हे लघुपट दाखवण्यात आले. गुरुवारी (1 मे) सायंकाळी 6 वाजता सहकार सभागृहात पारितोषिक वितरण होईल. ‘सत्यमेव जयते’ उपक्रमाच्या संशोधन विभागप्रमुख स्वाती भटकळ, चांदनी पारेख, अभिनेता रवींद्र मंकणी, मिलिंद शिंदे, गोवा राज्याच्या माहिती आयुक्त व ज्येष्ठ समाजसेविका लीना मेहंदळे यावेळी उपस्थित असतील. नंतर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती शिवराज वाईचळ लिखित-दिग्दर्शित ‘उळागड्डी’ ही एकांकिका सादर होणार आहे.
52 प्रवेशिका
लघुपटांसाठी स्त्री, बालक, भ्रष्टाचार, पर्यावरण आणि युवक हे विषय देण्यात आले होते. केरळ, गोरखपूर, चेन्नई, झारखंड, मुंबई, पुणे, पाचगणी, शिरूर, नाशिक आणि नगर येथून 52 प्रवेशिका आल्या. त्यापैकी 31 लघुपटांची निवड सादरीकरणासाठी झाली. बहुतेक निर्माते-दिग्दर्शकांनी ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. एफटीआयचे (पुणे) संकलक मिलिंद दामले, सुषमा दातार, कामोद खराडे व जयर्शी कनल यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.