आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - स्नेहालयातील विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांत फावल्या वेळेत ‘अर्थ स्टुडिओ’त काम करून संपूर्ण नैसर्गिक रंगातील पर्यावरणपूरक अशा शाडूच्या 200 गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्यातील 15 मूर्ती बोस्टन, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डी. सी., डेट्राइट येथील मराठी मंडळांकडे संस्थेचे विश्वस्त राजीवकुमार यांच्यामार्फत रवाना झाल्या.
मंजिरी व गणेश कुटे या बंगळुरू येथील संगणक क्षेत्रात काम करणार्या दांपत्याने स्नेहालयाच्या अर्थ स्टुडिओची जबाबदारी मेमध्ये स्वीकारली. या उपक्रमाचे लोकार्पण 1 मे रोजी अभिनेते आमिर खान यांच्या हस्ते झाले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील प्रादेशिक कुंभारकला प्रशिक्षण केंद्र आणि बंगळुरूच्या अशाच प्रशिक्षण केंद्राद्वारे मातीच्या विविध वस्तू व नित्योपयोगी साधने बनवण्याचे प्रशिक्षण स्नेहालय संस्थेतील असाध्य आजारांनी बाधित असलेल्या विद्यार्थी व महिलांना देण्यात आले.
सुराज सुतार, जावेद शेख, मनोज अहिरे, अमर बगुर, अमित उजागरे, प्रदीप मोकाळे, अक्षय देशमुख, मयूर शिंगारे, शुभम बेरड, अक्षय शर्मा आदी विद्यार्थ्यांनी 6, 11 व 14 इंच आकाराचे शाडूचे गणपती यंदाच्या गणेशोत्सवासाठी बनवले आहेत. या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान अपंगांसाठी काम करणार्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नसीमा हुरजूक यांच्या हस्ते स्नेहालय प्रकल्पात करण्यात आला. अमेरिकेला पाठवल्यानंतर उर्वरित गणेशमूर्तींची विक्री करून हा निधी गणेशमूर्ती बनवणार्या संबंधित विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी वापरला जाणार आहे.
येत्या गणेशोत्सवात 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथे या मूर्तींचे प्रदर्शन व विक्री केंद्र असेल, अशी माहिती संस्थेचे सचिव राजीव गुजर यांनी दिली.
नैसर्गिक रंगाचा वापर
शाडूचे गणपती बाजारात उपलब्ध असले तरी त्यातील अनेक मूर्तींचे रंग विषारी रसायनांपासून तयार केलेले असतात. स्नेहालयातील मूर्तींना आंबेहळद, नीळ, रक्तचंदन तसेच भाज्यांपासून तयार केलेले रंग देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी मंजिरी कुटे यांना शिल्पकार प्रमोद कांबळे, अरविंद कुडिया, अशोक डोळसे, कलारंगच्या सुजाता पायमोडे, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी तसेच कला अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांनी मदत केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.