आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहालयाच्या 'रेडिओ नगर ९०.४ एफएम'चा वर्धापन दिन साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरची माती, संस्कृती आणि महतीचा स्पर्श लाभलेल्या 'रेडिओ नगर ९०.४ एफएम' या २४ तास चालणाऱ्या देशातील पहिल्या कम्युनिटी रेडिओचा पाचवा वर्धापन दिन बुधवारी लहान बालिकेच्या दत्तकविधानाने साजरा करण्यात आला.

स्नेहालय या सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजातील वंचित, शोषित घटकांना 'आवाज' देण्यासाठी, नगरकरांच्या सांस्कृतिक गरजा भागवण्यासाठी, तसेच सर्वसामान्यांना आपले विचार मांडण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी या कम्युनिटी रेडिओला प्रारंभ करण्यात आला. "रेडिओ नगर'चे प्रसारण आता अखंडित २४ तास केले जाते.
रेडिओ नगरचा पाचवा वर्धापन दिन बालिकाश्रम रस्त्यावरील लेंडकर मळ्यातील डॉ. आडकर बाल कल्याण संकुलात बुधवारी दुपारी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्नेहांकूर संस्थेतील बालिकेला दत्तक देण्याचा कार्यक्रम आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यावेळी झाला. आपल्या भाषणात आमदार जगताप यांनी "रेडिओ नगर'च्या वाटचालीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्यांच्या हस्ते झाले.

महापौर अभिषेक कळमकर यांनीही 'रेडिओ नगर'च्या कार्यक्रमांची प्रशंसा करून सर्व टीमचे अभिनंदन केले. डॉ. अंशू मुळे, स्पर्धेचे परीक्षक अशोक डोळसे, प्रसन्ना पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री फुलसौंदर हिने केले, तर आभार रूपाली देशमुख यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.

या कार्यक्रमास 'रेडिओ नगर'चे मार्गदर्शक डॉ. गोपाळराव मिरीकर, सुवालाल शिंगवी, संजय गुगळे, राजीव गुजर, शिल्पकार प्रमोद कांबळे, "रेडिओ सिटी'च्या गायत्री महादेवकर, बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर करवंदे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मंचाचे पदाधिकारी, शिरीष चाटे, पी. डी. कुलकर्णी, डॉ. प्रिती भोम्बे, श्रीपाद दगडे, डॉ. सुचित तांबोळी, पुष्कर तांबोळी, सुधीर मेहता, केदार भोपे, अनिता माने आदी उपस्थित होते.
आवाज तुमचा, रंग प्रतिभेचा...
'रेडिओ नगर'च्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या "आवाज तुमचा, रंग प्रतिभे'चा या पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक रूचिता बोरवणकर हिला मिळाला. ऐश्वर्या बोरकर साक्षी चौधरी यांना दुसरा क्रमांक विभागून मिळाला. श्रावणी देव हिला तिसरा क्रमांक मिळाला. अंकिता पाडळे सायली आधाट यांना उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली.
बातम्या आणखी आहेत...