आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Activist Dr. Jagganath Wani News In Marathi, Divya Marathi

आयुष्यातील प्रत्येक संकटाचा आव्हान म्हणून स्वीकार केला...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वय 80, पण उत्साह एखाद्या तरूणाला लाजवेल असा! ज्या संस्था प्रामाणिकपणे समाजोपयोगी कामे करतात, त्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात देण्याचा सदैव ध्यास. या माणसाने गेल्या 30 वर्षांत शंभराहून अधिक संस्थांना तब्बल 70 लाख डॉलर्सची मदत केली आहे. प्रसिद्धी आणि भाषणापासून दूर राहणा-या या समाजसेवकाचे नाव आहे डॉ. जगन्नाथ वाणी. ‘आयुष्यात अनेक संकटे आली, पण मी कधी रडत बसलो नाही. प्रत्येक संकटाचा आव्हान म्हणून स्वीकार केला’, असे डॉ. वाणी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना म्हणाले.

मूळचे धुळ्याचे आणि कॅनडात अनेक वर्षे वास्तव्य असलेल्या डॉ. वाणी यांनी भारतातील अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करून त्यांचा हुरूप वाढवला आहे. नगरच्या स्नेहालय संस्थेला त्यांनी भेट दिली. संस्थेच्या विविध प्रकल्पांचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कोल्हापूर येथील अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले त्यांच्या समवेत होत्या. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.

डॉ. वाणी 1984 पासून विविध सेवाभावी संस्थांना मदत करत आहेत. महामानव बाबा आमटे यांचे आनंदवन, डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा प्रकल्पा यासह शंभराहून अधिक संस्थांना त्यांनी मोठी मदत केली आहे. स्किझोफ्रेनियासारख्या दुर्धर रोगाशी झुंजणा-या रूग्णांसाठी ‘स्किझोफ्रेनिया अवेरनेस सोसायटी’मार्फत पुण्यात त्यांचे काम सुरू आहे. चित्रकला, नृत्य व संगीताच्या माध्यमातून व्याधिग्रस्तांसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला चांगले यश मिळाले आहे.

समाजातील वंचित, शोषित व गरजू घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्यांचे मला कौतुक वाटते. मात्र, मदत केवळ कागदपत्रे पाहून मी करत नाही. प्रत्यक्ष भेट देऊन, काम पाहून मी मदत देतो. संस्थेपेक्षा संस्था चालवणा-याचे व्हीजन, डेडिकेशन महत्त्वाचे असते. स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, नीलिमा मिश्रा, ‘माऊली’चे डॉ. धामणे दाम्पत्य, ‘अवनी’च्या अनुराधा भोसले यांचे काम मोलाचे आहे. ही कामे कधी पूर्ण होणार नाही, ती सतत सुरूच ठेवावी लागणार आहेत, असे डॉ. वाणी म्हणाले.

माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली. माझ्या पत्नीला स्किझोफ्रेनिया आहे. आमचे लहान मूल दगावले. पण त्यातून सावरून मी समाजसेवेसाठी वाहून घेतले. धुळ्याला माझ्या वडिलांच्या नावाने नेत्ररूग्णालय असून तेथे कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व शालेय मुलांची नेत्रतपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्याची योजना आम्ही सुरू केली आहे. वेळीच नेत्रविकार दूर झाले, तर त्यांचे आयुष्य बदलून जाईल.
डॉ. वाणी म्हणाले, 2008 मध्ये मी निवृत्ती घेणार होतो. पण सुरू केलेल्या कामाचा डोलारा सांभाळण्यासाठी योग्य माणूस मिळत नाही. खरेतर लोक जेव्हा चाला म्हणतात, तेव्हाच थांबण्यात मजा असते. लोकांनी थांबा असे सांगण्याची वेळ कधी येऊ नये...

कॅनडा सरकारचे औदार्य
सामाजिक कामासाठी एकास तीन या प्रमाणात कॅनडा सरकार मॅचिंग ग्रँट देते, असे डॉ. वाणी यांनी सांगितले. कामाचा अहवाल दर सहा महिन्यांनी सादर केल्यानंतर त्याचा अभ्यास करून सरकार मदत देऊ करते. प्रकल्पाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने ही मदत विनासायास मिळते. भारतात मात्र सामाजिक कार्य करणा-यांना सरकारकडून मदत मिळवताना प्रचंड यातायात करावी लागते. अनेकदा अनुदानाचा धनादेश मिळवताना पैसे द्यावे लागतात. त्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळते.

चित्रपटांतून प्रबोधन अन् जागृती
सामाजिक प्रश्नांबाबत प्रबोधन व जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. वाणी यांच्या पुढाकाराने ‘देवराई’, ‘एक कप चहा’, ‘डॉक्टर बाळ बोलत नाही’ यासारख्या चित्रपटांची, तसेच अनेक माहितीपटांची निर्मिती करण्यात आली आहे. हे चित्रपट पाहून अनेकांना जगण्याची उमेद मिळाली. प्रकाश आमटे यांच्या प्रकल्पावरील माहितीपटाच्या 15 ते 20 हजार, तर नसीम हुरजूक यांच्या कार्यावरील माहितीपटाच्या 8 हजार सीडींची विक्री झाली. त्यातून संस्थेसाठी निधीही उभा राहिला.