आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनियंत्रित सोशल मीडिया ठरतोय समाज विघातक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सोशल मीडियाचे जोमाने आलेले पीक आता सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरत आहे. गेल्या पंधरा दिवसांत घडलेल्या राष्ट्रपुरुषांच्या विटंबनेच्या घटनांनी सोशल मीडियाची विघातक ताकद प्रकर्षाने पुढे आली. अनियंत्रिततेमुळे हा स्वैराचार वाढल्याचे तज्ज्ञांचे मत असून त्याला लगाम घालण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
राष्ट्रपुरुषांची आक्षेपार्ह चित्रे फेसबुक व व्हॉटस् अँपवर फिरत असल्याने मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले. शहर व जिल्ह्यात यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले. यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारी निवेदने स्वीकारण्यातच प्रशासनाचा वेळ जात आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने विविध तज्ज्ञांशी संवाद साधला. वैयक्तिक नियंत्रणच सोशल मीडियातील स्वैराचार व त्यातून निर्माण होणार्‍या विध्वंसक प्रवृत्ती थांबवू शकेल, असा आशावाद या तज्ज्ञांनी व्यक्त केला.
सोशल मीडियातूनही आवाहन
राष्ट्रपुरुषांची प्रतिमा मलिन करण्याची कुणाचीच कुवत नसून आक्षेपार्ह फोटो टाकून दुभंगण्यासारखी या राष्ट्रपुरुषांची प्रतिमा नाही. समाजात दुही माजवून फायदा घेण्याचा हा डाव आहे, हे लक्षात ठेवून कायदा हातात घेण्याऐवजी या समाजकंटकांविरुद्ध गावागावांमधून गुन्हे दाखल करावेत, असा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियातून फिरत आहे. पोलिसांच्या वतीनेही कायद्याचा धाक दाखवणारे आवाहन संदेशरूपाने फिरत आहे.