आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्या पद्धतीने विवाह लावत जपली सामाजिक बांधिलकी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवदांपत्य गौरव सुरभी यांच्यासह अशोक पितळे परिवार. - Divya Marathi
नवदांपत्य गौरव सुरभी यांच्यासह अशोक पितळे परिवार.
नगर - लग्नम्हटले की, हुंडा, वरात, घोडा, वाजंत्री, आहेर, पाहुणे मंडळींचा मानपान आले. मात्र, या परंपरांना फाटा देत नगरमध्ये एक विवाह साध्या पद्धतीने पार पडला. आर्थिकदृष्ट्या सधन परिवार, नवरा-नवरी स्वतः उच्चशिक्षित असूनही ना बस्ता, ना लग्नपत्रिका, ना बँड, ना जेवणावळी अशा साध्या पद्धतीने हा विवाह झाला. या विवाहाचा वाचलेला खर्च सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे सीए क्रीडा संघटक अशोक पितळे यांनी सांगितले.
सीए अशोक पितळे यांचे चिरंजीव गौरव आणि चंद्रपूर येथील व्यापारी करणजी भळगट याची मुलगी सुरभी यांचा विवाह साध्या पद्धतीने जवळच्या १०० नातेवाईकांच्या उपस्थितीत नगरमध्ये झाला. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’शी बोलताना सीए पितळे म्हणाले, माझे वडील धनराजजी पितळे अनेक वर्षे जैन समाजाचे अध्यक्ष होते. त्यांना नेहमी खंत होती की, समाजामध्ये लग्नावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. हे थांबले पाहिजे. समाजात खर्च पेलणारी फक्त पाच टक्केच कुटुंबे आहेत, उर्वरित ९५ टक्के कुटुंबांना आर्थिक कुवतीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे ही कुटुंबे दहा वर्षे मागे पडतात. त्यांची ही तळमळ मी जवळून पाहिली होती. आपणही साध्या पद्धतीने विवाह करावा, ही सुप्त इच्छा होती. ती पूर्ण करण्याची खुणगाठ मनाशी बांधली होती. मुलाची सोयरिक जमल्याने घरातील सदस्यांना याबाबत सांगितले. मात्र, त्यांचे महाबळेश्वर, हैदराबाद यासारख्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी लग्न करावे असा अाग्रह होता. मात्र, पत्नी, मुलगा आणि व्याही यांना सांगितले की, आपण अवास्तव खर्च केला, तर त्याचा कुटुंबाला काहीही उपयोग होणार नाही. अखेर सर्वजण साध्या पद्धतीच्या लग्नास तयार झाले. त्यामुळे माझी साध्या पद्धतीने विवाह लावण्याची इच्छा पूर्ण झाली. दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्नासाठी रक्ताच्या नात्यातील मोजक्याच पाहुण्यांना बोलवायचे ठरले. त्यानुसार सुमारे १०० जण या लग्नाला उपस्थित होते. लग्नाला आलेल्यांना ‘गेट टुगेदर’ म्हणून जेवण दिले.
या समारंभात माझ्या जवळच्या जीवलग मित्रांना समाविष्ट करता येऊ शकले नाही, ही खंत आहे. माझ्यावर माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वांना भविष्यात सामावून घेऊ, असे सीए पितळे म्हणाले.

आनंद उपभोगला
-परमेश्वरकृपेने आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी लग्न चांगल्या पद्धतीने करू शकलाे असतो. मात्र, जवळच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत झालेल्या या लग्नातून मी आनंद उपभोगला. कितीही चांगल्या जेवणावळ्या दिल्या, तरीदेखील येणारी मंडळी त्यात दोष काढत असतात.'' अशोकपितळे, सीए क्रीडा संघटक.
बातम्या आणखी आहेत...