आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Issue News In Marathi, 10 Lakh For Potholes,Divya Marathi

खड्डय़ांच्या पॅचिंगसाठी पुन्हा दहा लाख खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते उखडले, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने बुधवारी (19 फेब्रुवारी) प्रकाशित केले होते. त्यामुळे जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने खड्डय़ांच्या पॅचिंगसाठी पुन्हा 10 लाखांची तरतूद केली. येत्या आठ दिवसांत दोन हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत. दिल्लीगेट परिसरातून कामाला सुरुवात झाली आहे.
शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते पुन्हा उखडल्याने नगरकरांची हाडे खिळखिळी झाली आहेत. दिल्लीगेट ते पत्रकार चौक, नेप्तीनाका चौक ते आयुर्वेद कॉलेज, लालटाकी ते सज्रेपुरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग नाका यासारखे अनेक प्रमुख अंतर्गत रस्ते उखडले आहेत. या रस्त्यावरील ठिकठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी (पॅचिंग) गेल्या सहा वर्षांत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. परंतु रस्त्यांची अवस्था आहे, तशीच आहे. खड्डे चुकवताना अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. एकदा बुजवलेले हे खड्डे आठ दिवसांत पुन्हा जैसे थे होतात. याबाबत ‘दिव्य मराठी’ने 19 फेब्रुवारीला वृत्त प्रसिद्ध करताच मनपा प्रशासनाने खड्डय़ांच्या पॅचिंगसाठी पुन्हा 10 लाखांची तरतूद केली. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीगेट परिसरातून या कामास सुरुवात करण्यात आली. वाहतुकीला अडसर ठरणारे केवळ मोठे खड्डे निधितून बुजवण्यात येतील. प्रमुख मार्गांवरील खड्डे प्राधान्याने बुजवण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसांत दोन टप्प्यात हे काम करण्यात येणार आहे. आतापर्यंत तांत्रिक बाबींचा विचार न करता खड्डे बुजवण्यात आल्याने ते वारंवार उखडतात. आता नव्याने मंजूर करण्यात आलेल्या निधितून योग्य पद्धतीने खड्डे बुजवण्यात आले नाही, तर या खड्डय़ांची अवस्था पुन्हा जैसे थे होईल. मनपाने ठरावीक भागातील ठरावीक खड्डे न बुजवता, सर्वच खड्डे योग्य पद्धतीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
2 टप्प्यांत खड्डे बुजवू
4शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याठी 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यातून खड्डय़ांचे योग्य पद्धतीने पॅचिंग करण्यात येईल. सर्वच खड्डय़ांचे पॅचिंग करण्याऐवजी केवळ मोठय़ा खड्डय़ांचे पॅचिंग करण्यात येणार आहे. त्यात मिरवणूक मार्गावरील खड्डे प्राधान्याने बुजवण्यात येतील. आठ दिवसांत दोन टप्प्यांत हे काम होईल. खड्डे बुजवताना तांत्रिक बांबीसह कामाच्या दर्जाकडे विशेष लक्ष देण्यात येईल.’’ नंदकुमार मगर, शहर अभियंता, मनपा.
मनपाने जागे व्हावे..
4शहरात कोणत्याही मार्गाने जा. सर्वच रस्ते खड्डय़ांनी भरले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागते. महापालिकेने आता, तरी जागे होऊन रस्त्यांवरील खड्डे योग्य पद्धतीने बुजवावेत; अन्यथा पूर्वीप्रमाणे खड्डय़ांच्या पॅचिंगचा निधी केवळ कागदोपत्रीच वापरला जाईल.’’ अनिल तांगट, नागरिक.
नेप्ती नाका येथेही काँक्रिटीकरणाचे गज उघडे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अखेर या रस्त्याचेही पॅचिंग करण्यात आले आहे.