आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरांना पकडण्यात सोशल मीडियाची मदत, 2 वर्षांत 57 लाचखोर लाचलुचपतच्या जाळ्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दोन वर्षांत शहरासह जिल्ह्यात तब्बल ५७ लाचखोर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यात सर्वाधिक १७ लाचखोर महसूल विभागातील आहेत. लाच खाताना पकडले गेलेले अनेक लाचखाेर कायद्यातील पळवाटा शोधत समाजात पुन्हा ताठ मानेने वावरत आहेत. मात्र, आता लाचखोरांवर सोशल मीडियाचाही वॉच आहे. अनेक तक्रारदारांनी व्हिडिअो अथवा व्हाईस रेकॉर्डिंग, तसेच फोटोंच्या माध्यमातून लाचलुचपत विभागाकडे पुराव्यानिशी तक्रारी दिल्या. लाचलुचपत विभागानेही कोणतीही भिडभाड ठेवता या लाचखोरांना अटक केली. 
 
देश, राज्य, जिल्हा, शहर, गाव भ्रष्टाचाराने पोखरला जात असल्याचा अनेक अभ्यासकांचा दावा आहे. काळा पैसा बाहेर काढू, असे सांगत भाजप सरकार सत्तेत आले. त्यामुळे देशापासून तर गावपातळीपर्यंतचा भ्रष्टाचार थांबेल, अशीच नागरिकांची अपेक्षा होती. परंतु, भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला असला, तरी लाचखोरांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. लाचलुचपत विभागामार्फत दरवर्षी ३१ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह राबवला जातो. गर्दीची ठिकाणे, शाळा-महाविद्यालये, बसस्थानके आदी ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून भ्रष्टाचाराच्या विराेधात पुढे येण्याचे आवाहन सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येते. 

पत्रके, पोस्टर, फलकांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते. त्यामुळे लाचखोरांच्या विरोधात पुढे येण्यास पीडित नागरिक तयार होत आहेत. विशेष म्हणजे त्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. सरकारी कामासाठी जेथे पैसे मागितले जातात, तेथील व्हिडिओ अथवा व्हाईस रेकॉर्डिंग, फोटो घेऊन तक्रारदार थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क करत आहेत. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षांत पकडलेल्या लाचखोरांची संख्या वाढली आहे. नगर शहर जिल्ह्यात दोन वर्षांत ५७ लाचखोरांना जेरबंद करण्यात लाचलुचपत विभागाला यश मिळाले. दोनशे रुपयांपासून, तर लाख रुपयांची लाच स्वीकारताना या लाचखोरांना रंगेहाथ अटक करण्यात आली. मात्र, कायद्यातील पळवाटा शोधत यातील अनेक लाचखोर आज समाजात ताठ मानेने वावरत आहेत. 
 
नागरिकांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे 
नागरिकांनी भ्रष्टाचारा लारोखण्यासाठी पुढे आले पाहिजे, कोणत्याही दबावाला बळी पडता लाचलुचपत विभागाकडे तक्रार द्यावी. सोशल मीडियामुळे तक्रारींच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यात तरुण वर्गाचे प्रमाण अधिक आहे. दक्षता सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे, नागरिकांशी संवाद साधला जात आहे. 
- विष्णू ताम्हाणे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग. 
 
कलम ६५ चे प्रमाणपत्र आवश्यक 
लाचलुचपत विभागाने छापा टाकून संबंधित लाचखोराला ताब्यात घेतल्यानंतर चार्जशीट दाखल होते. संबंधित तपासी अंमलदाराने कलम ६५ नुसार प्रमाणपत्र सादर करून त्यात सर्व गोषवारा सांगणे आवश्यक आहे. अनेकदा उलट तपासात फिर्यादी आपला जबाब फिरवतात, त्यामुळे पकडलेले लाचखोर कायद्याच्या कचाट्यातून सुटतात. 
- अॅड.सुरेश लगड, विधीज्ञ. 
 
महसूल विभाग भ्रष्टच... 
लाचलुचपत विभागाने आतापर्यंत ५०० रुपयांपासून तर चार लाख रुपयांची लाच घेणाऱ्यांना रंगेहाथ पकडले, त्यांना शिक्षा झाली की नाही, तो भाग वेगळा, परंतु नागरिक लाचखोरांच्या विरोधात तक्रारी देण्यास पुढे येत आहेत. सर्वाधिक तक्रारी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विराेधात आल्या, लाचलुचपत विभागाने देखील या तक्रारींना न्याय देत महसूलच्या १७ लाचखोरांना तुरुंगात पाठवले. 
बातम्या आणखी आहेत...