आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

सोशल मीडियावरील प्रचाराने गाठली हीन पातळी,गांधी-राजळे यांच्या सर्मथकांमध्ये घमासान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोशल मीडियावरून विखारी प्रचाराला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजीव राजळे व महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांच्या सर्मथकांमध्ये सोशल मीडियात घमासान सुरू आहे. मतदारांना आमिषे दाखवणार्‍या व दोन गटांत तणाव निर्माण करणारा मजकूर या दोन्ही उमेदवारांच्या नावाने सोशल मीडियात फिरत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने ‘मतदारांना विकत घेणे आहे’, अशा आशयाचा मजकूर फेसबुकच्या एका अकाउंटवर टाकण्यात आला आहे. काही हॉटेलांची नावे देऊन याठिकाणी दारु, मटणाच्या पार्टीसाठी येण्याचे निमंत्रण, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व आमदारांचे क्रमांक देण्यात आले आहेत. प्रचाराची हीन पातळी गाठणार्‍या या पोस्टला लाईक व कॉमेंटही मिळाले आहेत. त्यामुळे नीलेश भांगरे यांनी यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. ही पोस्ट पसरवण्यामागे भाजपच्या पदाधिकार्‍यांचा हात असल्याचा संशय भांगरे यांनी फिर्यादित व्यक्त केला आहे.
महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी यांना ‘अमक्या-तमक्या’ समाजाच्या मतांची गरज नाही, असे वृत्तपत्राचे कात्रण टाकून विखारी प्रचार सुरू आहे. संबंधित समाजाला दुखावण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे. हा विखारी स्वरुपाचा प्रचार व्हॉटस् अँप व फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर सुरू आहे.


निवडणूक जवळ आली असताना आता शेवटच्या टप्प्यात मतदान फिरवण्यासाठी आणखी खटाटोपी होण्याच्या शक्यता आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्येही पत्रकांच्या माध्यमातून उमेदवारांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीतील सायबर तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. मात्र, अजूनपर्यंत एकाही उमेदवार अथवा कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट करण्यात आले.