आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Nagar, Police, Divya Marathi

Social Media: अफवांवर विश्वास ठेवू नका,पोलिसांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सोशल साइटवर पुन्हा एकदा राष्‍ट्रपुरुषांची बदनामी करणारा मजकूर प्रसिद्ध झाल्यामुळे रविवारी दुपारी शहरात काही ठिकाणी दगडफेक होऊन तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केल्यानंतर वातावरण निवळले. अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गेल्या आठवड्यात सोशल साईटवर राष्‍ट्रपुरुषांची बदनामी करणारा मजकूर टाकण्यात आला होता. त्यामुळे शहर व जिल्ह्यात बंद पाळले गेले. रविवारी पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर काहीजणांनी एसटी बसच्या काचा फोडल्या. एमआयडीसीतील सनफार्मा चौकात काहीजणांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. स्टेशन रस्त्यावर महावीर कलादालनासमोर सायंकाळी वाहनांवर दगडफेक झाली.

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तत्काळ महत्त्वाच्या चौकांमध्ये बंदोबस्त तैनात केला. सर्व संवेदनशील ठिकाणी दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली. गस्तही वाढवण्यात आली. त्यामुळे तणाव निवळला. कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, तसेच शहरातील शांतता अबाधित राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

एसटी प्रवाशांचे हाल
आंदोलक एसटी बसवर हल्ला करत असल्याने जामखेड आगाराने करमाळ्याच्या दिशेने जाणा-या सर्व गाड्या रविवारी सकाळपासून बंद केल्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
करमाळा आगाराने लांब पल्ल्याच्या गाड्या सकाळपासून रद्द केल्या. नंतर जामखेड आगारानेही करमाळ्याकडे जाणा-या गाड्या रद्द केल्या. औरंगाबाद-अकलूज, शेवगाव-पंढरपूर, पाथर्डी-पंढरपूर या गाड्या येथेच थांबवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. जामखेडहून भूमपर्यंत काही गाड्या गेल्या. परंतु तेथे गाड्या रोखण्यात आल्या.

पोलिस संरक्षण हवे
आंदोलक एसटी बसवर राग काढतात. त्यामुळे चालक, वाहकाबरोबर प्रवाशांच्या जिवाला धोका असतो. एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे गाड्या सोडण्यात आल्या नाहीत. पोलिस संरक्षण मिळाल्यास गाड्या जाऊ शकतील.’’
पी. एन. घुले, आगार व्यवस्थापक, जामखेड.