आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पोलिसांनीच आता ‘व्हॉटस् अप ग्रूप’ सुरू करावेत- राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सोशल मीडियावरून पसरणा-या अफवा रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षकांनी स्वत:च व्हॉट्सअप ग्रूप सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली.

काही समाजकंटकांकडून साईट्सवर अफवा पसरवल्या जातात. या प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे व्हॉटस्अप ग्रूप सुरू करण्याची मागणी केली. यावेळी मतीन सय्यद, शहर उपाध्यक्ष विलास बुगे, अरुण लबडे, अभिषेक शिंदे, रियाझ शेख, नीलेश मरकड, प्रतीक देशमुख, मयूर जगताप, कैलास भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, पोलिस अधीक्षकांनी लोकप्रतिनिधींचा एक ग्रूप तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणा-या अफवांची वस्तुस्थिती सांगावी. याच धर्तीवर पोलिस ठाणी, चौकीस्तरावर ग्रूप तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना द्याव्यात. रायुकाँने ई-कार्यकर्ता नावनोंदणी अभियानाच्या माध्यमातून 13 हजार 278 युवकांची नोंदणी केली आहे. नोंदणी केलेला हा डेटा राष्ट्रवादी युवक आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस्अप या सोशल नेटर्वकिंग साईटसवर अफवा पसरल्याने नगर शहरातही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याला पायबंद घालण्यासाठी या माहितीचा उपयोग होणार आहे. बलकवडे म्हणाले, पोलिस विभागाच्या वेबसाईट निर्मितीचे काम सुरू आहे. फेसबुकवरही पोलिसांचे पेज तयार केले जाणार आहे. व्हॉट्सअपचे ग्रूपदेखील तयार केले जाणार असून त्या माध्यमातून युवकांशी समन्वय साधला जाईल.
शहरातील कोण असावेत या ग्रूपमध्ये

पोलिस प्रशासनाने व्हॉटस् अपवर ग्रूप स्थापन करताना त्यात शहरातील लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, मोहल्ला समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश करावा, असेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सूचवले असल्याचे काळे यांनी सांगितले.