आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात अफवांचे पीक जोमात, विरोधकांवर शिंतोडे उडवण्याचा व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवर प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जाहीर प्रचाराची मुदत संपण्यापूर्वीच सोशल मीडियात अफवांचे पीक जोरात सुरू झाले आहे. विरोधी उमेदवारांबद्दल गैरसमज निर्माण करणारा मजकूर विविध मार्गाने पेरण्यात येत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी पडत आहे.

स्मार्ट फोनची संख्या वाढल्याने मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवार सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. "विकासाचा एकमेव पर्याय' असल्याचा भडिमार गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियातून उमेदवारांच्या समर्थकांकडून सुरू आहे. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोशल मीडियातील प्रचाराला गालबोट लागत आहे. शहरातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेल्या बातमीची कात्रणे गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस् अ‍ॅप व फेसबुकवर फिरत आहेत. वास्तविक ही बातमी कोणत्याही वृत्तपत्रात छापून आलेली नाही. यासंदर्भात जगताप यांच्याकडून तक्रार करण्यात आली आहे.
सर्वच उमेदवारांकडून मंगळवारी (14 ऑक्टोबर) सोशल मीडियाचा अधिक वापर होणार आहे. विरोधी उमेदवारांबाबत गैरसमज निर्माण करणारे संदेश मोठ्या प्रमाणात पसरवण्याची शक्यता गृहत धरून संबंधित यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित यंत्रणा तोकडी असल्याचा फायदा उठवत विरोधी उमेदवारांना नामोहरम करण्याचे प्रयत्न सोशल मीडियातू्न होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियातून खालच्या पातळीवर होणाऱ्या प्रचाराला जशास-तसे उत्तर देण्याची तयारी काही उमेदवारांनी केली असून यातून कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता आहे.