आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Social Welfare Committee Members To Boycott Meeting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समाजकल्याण समितीच्या सभेवर सदस्यांचा बहिष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अजेंडा न पाठवणे, तसेच मागील सभेतील महत्त्वपूर्ण विषयांचा इतिवृत्तांत समावेश केला जात नसल्याचे कारण पुढे करून सदस्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या सभेवर बहिष्कार घातला.
समाजकल्याण समितीचे सदस्य, तसेच सभापती यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. समित्यांमार्फत देण्यात येणार्‍या साहित्य खरेदीच्या मुद्दय़ांवरून अनेकदा सभा वादग्रस्त ठरली. सभापती शाहूराव घुटे सदस्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेत असल्याची खंत सदस्यांकडून व्यक्त होते.
शुक्रवारी सभेसाठी सर्व सदस्य जिल्हा परिषदेत आले होते. मागील सभेत झालेल्या विषयांचा इतिवृत्तात समावेश केला जात नाही, या मुद्दय़ावर सदस्य तुकाराम शेंडे, मीरा चकोर, रावसाहेब साबळे, अनिता पवार, मंदा गायकवाड, संगीता गायकवाड, उज्ज्वला शिरसाठ, डॉ. रामनाथ भुतांबरे आदींनी बहिष्काराचा निर्णय घेतला.
साबळे म्हणाले, 2013-2014 या वर्षात समाजकल्याण विभागाने सेसच्या 20 टक्के निधीतून पाचवी ते दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी 50 लाखांच्या सायकली पुरवण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ई-निविदा सूचनापत्रिकेवर या साहित्याचा दरकरार शासनस्तरावर उपलब्ध असल्यास निविदा विक्री केली जाणार नसल्याचे, तसेच निविदेवर कार्यवाही केली जाणार नसल्याचे नमूद केले आहे.
मात्र, जिल्हा परिषदेने प्रतिसायकल सुमारे साडेतीन हजार रुपयांनी ठेका दिला. शासकीय दरकरारानुसार वैशाली कंपनीची सायकल अवघी 3 हजार 60 रुपयांत उपलब्ध आहे. मात्र, दरकरार डावलून मनमानी पद्धतीने महागड्या सायकली खरेदी करण्यात आल्या. सभेत ज्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होते, त्याचा इतिवृत्तात समावेश होत नाही, अजेंडा पाठवण्याऐवजी फोनवरच सांगितले जाते. त्यामुळे सभेवर बहिष्कार घातल्याचे त्यांनी सांगितले.