आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीए रमेश फिरोदिया यांच्यामुळे महाग आरोग्यसेवा गरिबांच्या आटोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - संगमनेर तालुक्यातील साकूर येथे मोफत शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची उभारणी, नगर शहरात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेची भव्य इमारत, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन मशीन अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांना भरघोस आर्थिक मदत देऊन दातृत्वाचा
उत्तुंग आदर्श चार्टर्ड अकाउंटंट रमेश फिरोदिया यांनी समाजापुढे उभा केला आहे. मूळचे साकूर येथील असलेले फिरोदिया यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. घरची परिस्थिती बेताची. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना चिंचवड पदवीचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जावे लागले. पदवीचे शिक्षण १९६७ मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सीए होण्यासाठी मुंबईची वाट धरली. मुंबईतील सुंदरलाल अँड कंपनीत ते काम करू लागले. पुढच्या तीन वर्षांत म्हणजे १९७० मध्ये ते सीए झाले. ज्या कंपनीत ते काम करत होते, त्याच कंपनीने त्यांना भागीदार केले. त्यानंतर फिरोदिया यांनी व्यवसायात मागे पाहिले नाही. आता त्यांच्या मुंबईत दोन मोठ्या फर्म आहेत. पैसा मिळवत असताना आपण कोणत्या परिस्थितीतून वर आलो, याचा त्यांनी स्वत:ला विसर पडू दिला नाही. कांतीलाल जैन या सामाजिक कार्यकर्त्याच्या संपर्कात आल्यावर त्यांनी १९९७ मध्ये पद्व्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोरेगाव येथे वसतिगृह सुरू केले. तेथे १२० विद्यार्थ्यांची सोय झाली.
आपण ज्या गावातून पुढे गेलो, त्याच्यासाठी आपण काही देणे लागतो, ही भावना सातत्याने उराशी बाळगून फिरोदिया यांनी रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्ट स्थापन करून सन २००४ मध्ये साकूर येथे कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयात एक रुपयाही फी आकारली जात नाही. सर्व खर्च फिरोदिया ट्रस्टतर्फे केला जातो. येथील प्राध्यापकांसाठी निवासस्थानेही त्यांनी उभारली आहेत. तेथे तिन्ही शाखांचे मिळून ९०० विद्यार्थी शिकत आहेत.
दरम्यान, फिरोदिया यांनी नगरमधील आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी, महावीर भवन (रुग्णांच्या नातेवाइकांसह सर्वांसाठी अत्यंत माफक दरात भोजन मिळण्याची व्यवस्था) नर्सिंग कॉलेजसाठी भरीव आर्थिक मदत केली. नगरमधीलच दुरवस्था झालेल्या शिशू संगोपन संस्था या शाळेला त्यांनी भव्य इमारत बांधून दिली. या शाळेचा दरमहिन्याचा खर्चही तेच करतात. दोन महिन्यांपूर्वी फिरोदिया यांनी नगरमधील आयएमएस या संस्थेच्या ‘सीड’या उद्योजकता विकासाच्या उपक्रमासाठी एक कोटीची आर्थिक मदत दिली. नाशिकलाही चार सहकाऱ्यांच्या मदतीने वृद्धाश्रम चालवतात. आता फिरोदिया यांची जैन ओस्तवाल पंचायत सभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. जैन जमाजातील गरीब कुटुंबांना दर महिन्याला किराणा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, गरीबांना औषधे उपलब्ध करण, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार अाहे. तसेच, जैन समाजासाठी सर्वांच्या सहकार्याने भव्य मंगल कार्यालय उभारणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. या सर्व सामाजिक उपक्रमांत त्यांच्या पत्नी सविता यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभत आहे. आपल्या आर्थिक उन्नतीमागे असलेले समाजाचे ऋण मान्य करून फिरोदिया समाजासाठी चांगले काम करणाऱ्या संस्थांना भरीव आर्थिक मदत करत आहेत. सन २०११ मध्ये नगरमध्ये परतलेल्या फिरोदिया यांना संधी मिळाल्यास साकूरसारखी शैक्षणिक संस्थाही नगरमध्ये सुरू करायची आहे.
फक्त एक हजारात सीटी स्कॅन सुविधा
रमेशफिरोदिया यांनी राष्ट्रसंत आनंदऋषिजी हॉस्पिटलला सीटी स्कॅन मशीन घेऊन दिले आहे. सीटी स्कॅनसाठी रुग्णाकडून अवघे एक हजार रुपये फी घेतली जाते. या उपक्रमात झालेला सर्व तोटाही पाच वर्षे फिरोदिया भरून देणार आहेत.