आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भापकर गुरुजींनी तयार केलेल्या रस्त्यावरून धावणार बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी तयार केलेल्या रस्त्यांवरुन लवकरच एसटी बस धावणार आहे. येत्या डिसेंबरपासून गुंडेगाव ते पुणे एसटी बससेवा सुरू होत आहे. ही बससेवा गुंडेगाव, कोळगाव, कुकडी कारखाना, पिंपळगाव, लिंबी, कोंडेगव्हाण, दैवदैठण, शिरूरमार्गे शिवाजीनगर (पुणे) अशी धावणार आहे. सकाळी वाजता गुंडेगावातून ही बस निघेल. पुण्याहून पुन्हा याच मार्गे ही बस गुंडेगावात परतेल. दुसरी बस सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास याच मार्गाने धावेल. संध्याकाळी साडेपाच वाजता पुण्याहून निघालेली बस गुंडेगावात मुक्कामी असणार आहे.

एसटीचे विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी या बससेवेसाठी पुढाकार घेतला. भापकर गुरूजींच्या कामाचे यामुळे चीज होत असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. मी तयार केलेल्या मार्गावरुन एस. टी. महामंडळाची बससेवा आता सुरू होत अाहे हे माझे भाग्य आहे, असे भापकर गुरूजी म्हणाले.

भापकर गुरूजी यांनी मागील ५७ वर्षांत ४५ ते ५० किलोमीटर अंतराचे रस्ते डोंगर फोडून तयार केले आहेत. जिल्हा परिषद शाळेत नोकरी करताना त्यांना घाटरस्त्याची आवश्यकता लक्षात आली. सरकार किंवा इतर कोणी काही करेल, याची वाट पाहता त्यांनी शाळेची वेळ सांभाळून रोज स्वत: रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. आयुष्यभराची पुंजी त्यांनी या कामावर खर्च केली. रस्ता तयार झाल्याने अंतर आणि प्रवासाच्या वेळेत मोठी बचत झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे लाखो रूपये वाचले आहेत. या मार्गाने एसटी बस सुरू करण्यात यावी, अशी भापकर गुरूजींची अनेक वर्षांची मागणी होती. आता ती पूर्ण होत आहे.

डोंगररस्त्याबद्दल भापकर यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मागील वर्षी नवी दिल्लीत त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारांची रक्कमही भापकर गुरूजी यांनी रस्त्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी खर्च करण्याचे ठरवले आहे. पर्यावरणाचा समतोल ढळू नये, म्हणून सर्वांनी मोठ्या प्रमाणात झाडे लावावीत, असा त्यांचा आग्रह असतो. ते स्वत: फळे विकत घेऊन इतरांना देतात त्यातील बिया मला परत करा असे सांगतात. या बियांचा वापर करून लाखो रोपे गुरूजींनी तयार करून नगर तालुक्यात ठिकठिकाणी लावली आहेत.
बातम्या आणखी आहेत...