सोलापूर- मूकबधिरांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत येथील निहार निर्मलप्रसाद कुलकर्णी याने पाचपैकी साडेचार गुण मिळवत सुवर्ण पदक पटकावले. या कामगिरीवर त्याची भारतीय संघात िनवड झाली. मंगोलिया येथे होणाऱ्या अाशियाई बुद्धिबळ स्पर्धेत तो भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करेल. निहारने यापूर्वी १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले होते. या कामगिरीवर त्याने उझबेकिस्तान येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. त्यानंतर दुसऱ्यांदा तो आशियाई स्पर्धेत प्रतिनिधित्व करेल.
इंदौर(मध्य प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्याने अग्रमानांकित व्ही. चंद्रन (केरळ) याच्यासह महेंद्र पाल (छत्तीसगड), के. एम. शशीधर (कर्नाटक) या मानांकित खेळाडूंना पराभूत करत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. तो चार गुणांसह आघाडीवर असल्यामुळे केरळच्याच हुसेन काेया याच्याबरोबर खेळताना कोणताही धोका पत्करता त्याने बरोबरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
निहारला लहानपणी भानुदास आंबट आता सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, चेअरमन शरद नाईक जिल्हा मूकबधीर संघटनेचे अध्यक्ष श्रीराम घाडगे यांनी अभिनंदन केले.