आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाचे कठडे गायब झाल्याने सोलापूर मार्ग धोकादायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत- तालुक्यातून जाणा-या व सर्वात जास्त वाहनांची वर्दळ असणा-या नगर-सोलापूर मार्गावरील पुलांचे कठडे गायब झाले आहेत. रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना याचा अंदाज येत असल्याने अनेक भीषण अपघात झाले आहेत. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम, जागतिक बँक प्रकल्प एकमेकांकडे जबाबदारीचा चेंडू टोलवत असल्याने या मार्गावरील गावांतील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचा कधीही उद्रेक होऊ शकतो.
या प्रश्नासाठी एक शिष्टमंडळ पालकमंत्री मधुकर पिचड व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना भेटणार आहे. पुलांची दुरुस्ती करून संरक्षक कठडे बसवावेत, या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास सुरुवात करावी, या मार्गावरील गावांमध्ये काही अंतरापर्यंत दोन्ही बाजूंनी सौरऊर्जेवरील पथदिवे बसवण्यात यावे आदी मागण्या शिष्टमंडळ करणार आहे.
नगर-सोलापूर मार्गावरील वाहतूक दोन्ही टोलनाके बंद झाल्यापासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्याची हद्द असलेल्या मांदळीपासून चापडगाव मार्गावरील गावाच्या नजीक असणा-या नदी, नाले, ओढ्यांवरील पुलांचे संरक्षक कठडे तुटले, तर काही ठिकाणी पाइप कापून नेले आहेत. बाभुळगाव खालसा, माहीजळगाव व पाटेगावजवळील पुलांची उंची अत्यंत कमी आहे. पाटेगावजवळील पुलाचे कठडेच गायब झाले आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून जाणारी बहुतेक वाहने याच मार्गावरून जात आहेत. अशा ठिकाणी संरक्षक कठडे तातडीने बसवण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

जिल्हाधिका-यांना याप्रश्नी भेटणार
रहदारीच्या या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मार्गदर्शक फलक नाहीत. पाटेवाडी वळण रस्ता सरळ करण्याबरोबरच पुलांचे संरक्षक कठडे बसवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिका-यांना शिष्टमंडळासह भेटणार आहोत.’’ परमवीर पांडुळे, सदस्य, जिल्हा परिषद.

...तर धडा शिकवू
पुलांची उंची वाढवण्याबरोबरच रुंदी वाढवणे, मांदळी, माहीजळगाव, पाटेगाव, पाटेवाडी फाटा या ठिकाणी प्रवासी निवारा बस थांबा गरजेचे आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी झोपेचे सोंग सोडून समाजहिताच्या कामाला प्राधान्य द्यावे; अन्यथा त्यांना धडा शिकवावा लागेल. ’’प्रवीण घुले, जिल्हा परिषद सदस्य, चापडगाव गट.