आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेने दिलेले सौरबंब ठरले कुचकामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील अपंग, मूकबधिर मतिमंद विद्यार्थ्यांची ११ वसतिगृहे शाळांना मागील वर्षी १० लाख रुपये खर्चून सौरबंब देण्यात आले. परंतु या सौरबंबांच्या कार्यक्षमतेविषयी संबंधित शाळांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक सौरबंब काही महिन्यांतच नादुरुस्त झाले. त्यामुळे त्यांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जिल्ह्यात २०१३-२०१४ या वर्षात जिल्हा परिषदेच्या तीन टक्के स्वनिधीतून (सेस) अपंगांच्या वसतिगृहांना सौरबंब पुरवण्याची योजना राबवण्यात आली. त्यासाठी १० लाखांची तरतूद होती. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने दिलेल्या पत्रानुसार दरकरार विचारात घेऊन समाजकल्याण समितीने २२ जानेवारी २०१४ रोजी ठराव केला. १० फेब्रुवारी २०१४ रोजी कोल्हापूर येथील लक्ष्मी अॅग्रो एजन्सीला ५०० लिटर क्षमतेचे सोलर वॉटर हिंटिंग सिस्टिम पुरवण्याचे आदेश देण्यात आले. त्यासाठी प्रत्येकी ८७ हजार ३३० रुपये खर्च करण्यात आला. सौरबंबासाठी सुरुवातीला अपंगांच्या शाळांची निवड करण्यात आली. नंतर आणखी शाळांचा समावेश केला गेला.

ही यंत्रणा बसवल्यानंतर अपंग विद्यार्थ्यांना गरम पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. पण काही शाळांनी या यंत्रणेसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. कोपरगाव येथील लायन्स मूकबधिर अपंग विद्यालयाने सौरबंब बंद असल्याची तक्रार पाच-सहा वेळा जिल्हा परिषदेकडे केली. एकही दिवस ही यंत्रणा चालली नसल्याचे या शाळेचे म्हणणे आहे. सौरबंबातून गरम पाणी मिळणे अपेक्षित असताना कोमट पाणी येते, अशी काही शाळांची तक्रार आहे.

प्रहार अपंग क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात जिल्हा समाजकल्याण विभागाकडून माहिती मागवून तक्रारींवर काय कारवाई केली, अशी विचारणा केली. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने कंपनीला पत्र पाठवून सौरबंब दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींशी मोबाइलवर संपर्क साधूनही दाद मिळत नाही, असे स्पष्टीकरणही समाजकल्याण अधिकार्‍यांनी दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेने थेट कंपनी व्यवस्थापकाकडे तक्रार केली.

पुरवठादाराला सूचना
शाळांमध्ये बसवलेल्या सौरबंबांची दुरुस्ती करण्याच्या सूचना पुरवठादाराला दिल्या आहेत. तातडीने त्रुटी दूर करून अहवाल सादर करण्याचेही पत्राद्वारे कळवले आहे. दुरुस्ती करून दिली जाईल, असे कंपनीने सांगितले आहे.'' प्रदीपभोगले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी.

आम्हीही तक्रार करू...
सौरबंबातून गरम पाण्याऐवजी कोमट पाणी येते. यासंदर्भात आम्ही तक्रार केली नव्हती, पण आता तक्रार करणार आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी तात्पुरती गरम पाण्याची व्यवस्था केली आहे.'' पोपटफरबडे, कोंडाजी मतिमंद विद्यालय, अकोले.

बंब बसवल्यापासून बंदच
सौरबंब बसवल्यापासून बंदच आहे. तो अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. यासंदर्भात पाच ते सहा वेळा पत्रव्यवहार केला. पण त्याची दखल कोणीही घेतली नाही.'' बी.एन. गुरुसाळ, लायन्स मूकबधिर विद्यालय, कोपरगाव.

दर्जासंदर्भात शंका
जि.प.ने दिलेला सौरबंब सुरू आहे. सुरुवातीला काही लिटर पाणी गरम येते, नंतर कोमट पाणी येऊ लागते. शिर्डीत इतर कंपन्यांनी बसवलेले सौरबंब चांगले आहेत.'' एम.बी. चौधरी, साई श्रद्धा विद्यालय, शिर्डी.

सौरबंब निकृष्ट
संबंधित पुरवठादार कंपनीने सौरबंबाचा जो नमुना दाखवला होता, तो बसवलाच नाही. त्यामुळे यासंदर्भात शाळांच्या तक्रारी आहेत. बसवलेले बंब निकृष्ट आहेत, तशी तक्रार आम्ही जिल्हा परिषदेकडे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी.'' बाबासाहेबमहापुरे, शहराध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन.

पाणी तापत नाही
यंत्रणा सुरू करून चाचणी घेण्यात आली. पण पाणी अपेक्षेइतके तापत नाही. कोमट पाणी उपलब्ध होते. यंत्रणा बसवल्यानंतर दोन महिन्यांनी ही अडचण सुरू झाली.'' तुषारठुबे, निवासी मतिमंद विद्यालय, पारनेर.

तक्रार आल्यानंतर दुरुस्ती
आमच्याकडे जिल्हा परिषदेने अथवा कोणीही तक्रार केलेली नाही. आमचे स्थानिक प्रतिनिधी नगरमध्ये आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसेल, तर सिस्टिम संदर्भातील तक्रारीची एक प्रत आम्हाला पाठवावी. आम्ही तत्काळ दुरुस्ती करून देऊ.'' अनिलपाटील, मार्केटिंग मॅनेजर, लक्ष्मी अ‍ॅग्रो एनर्जी.