आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान तळेकरांचेही कापले होते शिर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळगाव (श्रीगोंदा) - लान्सनायक हेमराज यांच्या हौतात्म्याने नगर जिल्ह्यातील कोळगावकरांना 12 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण करून दिली आहे. या छोटेखानी गावचे सुपुत्र भाऊसाहेब तळेकरदेखील हेमराजप्रमाणेच शहीद झाले होते. पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला आणि त्यांचे शिर घेऊन गेले. आता या कुटुंबाजवळ आहेत फक्त मुलाच्या आठवणी आणि शोक. वडिलांचे तर मन:स्वास्थ्यच हरपले आहे. आवाज गेला आहे. भाऊसाहेबांची आई आणि बहिणीने दै. ‘दिव्य मराठी’जवळ आपल्या वेदना व्यक्त केल्या. लष्कराचे कोणीही सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी येत नसल्याची त्यांची तक्रारही आहे.

लान्सनायक हेमराज आणि सुधाकर यांच्याबाबत घडलेली घटना टीव्हीवर झळकली. भाऊसाहेबांचे कुटुंबीय भावनांना आवर घालू शकले नाहीत. हमसाहमशी रडले. आपल्या मुलासोबत झालेला अमानुषपणा त्यांना आठवत होता. मराठा लाइट इन्फंट्री युनिटचे जवान भाऊसाहेब नौशेरा भागात पाक सीमेलगतच्या एका चौकीवर तैनात होते. 27 फेब्रुवारी 2000 हा तो दिवस. पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. ग्रेनेड हल्ला केला. सहा भारतीय जवान शहीद झाले. भाऊसाहेबांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे पाच सैनिक मारले आणि भाऊसाहेबांनाही वीरमरण आले. हल्लेखोरांत इलियास काश्मिरी होता. त्यानेच भाऊसाहेबांचे शिर कापले होते आणि सोबत घेऊन गेला होता. मुशर्रफ यांनी काश्मिरीला पाच लाख रुपयांची बक्षिसीही दिली होती. त्या वेळी पाकिस्तानी सैन्यात असलेला काश्मिरी आज कुख्यात अतिरेकी आहे.
आईची चेहरा पाहण्याची इच्छा
भाऊसाहेबांची बहीण मीनाक्षी हराळ सांगत होत्या, भाऊसाहेबांचे पार्थिव आणले गेले तेव्हा आई त्यांचा चेहरा पाहण्यासाठी हट्ट करत होती. हा माझाच मुलगा आहे हे कसे मान्य करणार असा तिचा सवाल होता. परंतु लष्कराच्या लोकांनी तिची समजूत काढली. भाऊसाहेबांचे आयकार्ड आणि घड्याळ जवळ सापडले असे ते म्हणाले. आमचे मन मात्र मानत नव्हते. त्यांनी चेहरा न दाखवताच अंत्यसंस्कार केले. आई सीताबाई म्हणतात की, मला पुढे कळाले की ते भाऊसाहेबांचे केवळ धडच होते. भाऊसाहेबांच्या जाण्याने कुटुंब कोलमडले आहे. त्यांना लष्कराने सुमारे 12 लाख रुपये दिले होते.
त्यातून मीनाक्षीचे लग्न केले. घराची दुरुस्ती केली. काही पैसे आहेत, त्यातून घर चालते.
बारा वर्षांत कोणी भेटण्यास आले नाही
गावातील एक ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सदाशिव हराळ सांगतात, 12 वर्षांत तळेकर कुटुंबाची वास्तपुस्त करण्यासाठी लष्कराचे कोणीही आले नाही. शहिदांच्या कुटुंबीयांची दखल उपोषण केल्यावरच घेतली जाते की काय याचा खेद वाटतो. हेमराजच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला आणि लष्कर, सरकार त्यांच्या घरी गेले. लाखो रुपये देण्याचा शब्द दिला. तळेकर कुटुंबाचे बलिदान लहान आहे काय, असा सवाल सदाशिव यांनी केला.

स्मारक उभारणीतही भ्रष्टाचार
शहीद भाऊसाहेब यांच्या नावाने काही नेत्यांनी ट्रस्ट काढले. गावात शाळा आणि कम्युनिटी हॉल उभारण्याचे आश्वासन लोकांना देण्यात आले. लाखो रुपये जमवले गेले. शाळा तर निघालीच नाही. कम्युनिटी हॉलच्या नावाखाली लाख-दीड लाखांचे बांधकाम झाले. उरलेले पैसे विरून गेले.

गावातील 350 लोक सैन्यात
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव हे छोटेसे गाव. शूरवीरांसाठी ते प्रसिद्ध आहे. येथील 350 लोक लष्करात आहेत.