आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर ठिय्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सोनई (ता. नेवासे) येथे झालेल्या तीन दलित तरुणांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ लोकाधिकार आंदोलन, महिला मंडळ फेडरेशन व पीडितांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्याने आंदोलक थेट निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या प्रवेशद्वारावर थडकले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी नंतर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

लोकाधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विजय काळे व कोरो संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी किंवा अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी आमच्याशी चर्चा करावी, अशी मागणी करत आंदोलकांनी निदर्शने सुरूच ठेवली. मात्र, प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने संतापलेले आंदोलक निवासी उपजिल्हाधिकार्‍यांच्या प्रवेशद्वारावर थडकले. पोलिसांनी प्रवेशद्वाराच्या आतून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आत शिरले. यावेळी पोलिस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिसांची अधिक कुमक मागवण्यात आली.

आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना निवेदन देत त्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात लोकाधिकारचे पदाधिकारी अरुण जाधव, कुसुम साळवे, अनंत लोखंडे, मेहबूब सय्यद, विनय सावंत, बापू ओहोळ, सुधीर साळवे, भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक वाघ, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे, अशोक मोरे, चंद्रकांत काळे, आसाराम काळे, महिला मंडळ फेडरेशनच्या पदाधिकारी मुमताज शेख यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.