आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमण्यांनो, जाऊ नका सोडून शहर, हे घर तुमचंच आहे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सिमेंट काँक्रीटच्या जंगलात वावरतानाही काही मंडळी निसर्गाशी, पशू-पक्ष्यांशी मैत्र हरवू देत नाही. पक्षीही मग त्यांच्या कुटुंबातील एक होऊन जातात. माणिक चौकात राहणारे प्रवीण बोरा यांचं कुटुंबं असंच मनापासून चिमण्यांवर प्रेम करणारं आहे.
नगर शहरातील जुन्या वाड्यांच्या, इमारतींच्या भिंतीमध्ये पक्ष्यांना विसावण्यासाठी, घरटं तयार करण्यासाठी कलात्मक कोनाडे असत. काळाच्या ओघात यातील अनेक वाड्यांची जागा आरसीसी इमारतींनी घेतली आहे. नवे इमले उभारताना पक्ष्यांचा विचार कोणाला सूचलाच नाही. माणकेश्वर गल्लीतील अशाच एका अपार्टमेंटमध्ये ‘विश्वदर्शन’चे संचालक असलेले बोरा दहा वर्षांपूर्वी रहायला आले. सुदैवाने त्यांच्या घरातील स्वयंपाक घरासमोरील खिडकी बर्‍यापैकी मोठी आहे. गुलाब, मनिप्लांट अशा झाडाच्या कुंड्या ठेवण्याबरोबरच बोरा यांनी तिथे ‘काटा-तराजू’ म्हणजे एका बाजूला पाण्याचं भांडं आणि दुसर्‍या बाजूला धान्यासाठी ताटली बांधली. ही खास पक्ष्यांसाठी सोय. सकाळी उठलं की, पहिल्यांदा पाणी आणि मूठभर धान्य तिथं ठेवायचं आणि मगच इतर कामांना सुरुवात करायची अशी त्यांची दिनश्चर्या. दाणा-पाणी मिळू लागल्यानं चिमण्या खिडकीत येऊ लागल्या. हळूहळू ही संख्या 40-50 वर गेली. चिमण्यांबरोबर बुलबुल आणि इतर पक्षीही अधून-मधून डोकावू लागले.
प्रवीण यांची आई ताराबाई, पत्नी सुनीता, बहीण सुशीला पितळे आणि कन्या प्रणिता, पूर्वा अशा सगळ्यांनाच या चिमण्यांचा लळा लागला आहे. घरात नवीन कुठला पदार्थ केला, सणवारी मिठाई बनवली, की आधी सर्वांना चिमण्यांची आठवण होते. बाजरीचे दाणे हे चिमण्यांचं आवडतं खाद्य असलं, तरी बोरा कुटुंबीयांनी देऊ केलेलं सगळं त्यांना भावतं. पोळी, बिस्किटं हाही त्यांचा आवडता आहार बनला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त ही या चिमण्यांची गर्दीची वेळ. सायंकाळी संख्या जरा जास्तच. घरट्याकडे परतताना या चिमण्या आपल्या चोचीत पिल्लांसाठी धान्य घेऊन जातात..
अवकाळी पाऊस, गारपिटीचा परिणाम
चिमण्यांच्या रोजच्या सहवासामुळे बोरा कुटुंबाचे त्यांच्याशी नातेच जुळले आहे. चिमण्या जणू काही त्यांच्याशी संवाद साधत आहोत असा चिवचिवाट करत खिडकीत विसावतात. चिमण्या त्यांच्या ओळखीच्या झाल्या आहेत. मागील वर्षभरापासून मात्र चिमण्यांची संख्या काहीशी कमी झाली आहे. अलीकडे झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर तर ही संख्या आणखी कमी झाली, असे निरीक्षण प्रवीण बोरा यांनी नोंदवले.