आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये चिमण्या झाल्या दुर्मिळ; उपनगरांत स्थलांतर सुरू..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लहानपणी सर्वांत प्रथम ओळख होणारा पक्षी म्हणजे चिऊ किंवा चिमणी. चिमणीच्या माध्यमातूनच निसर्गाशी पहिली जवळीक होते. नगरमधील पुढच्या पिढय़ांना मात्र चिमणीची ओळख करून घेण्यासाठी शहराबाहेर जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नगरमधील चिमण्यांचे वेगाने स्थलांतर होत असल्याने शहरीतील अनेक भाग चिवचिवाटाला पारखे होत आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू, कोलकाता यासारख्या मोठय़ा शहरांतून चिमण्या गायब झाल्यामुळे चार वर्षांपूर्वी मोठा गहजब उडाला. पण आता नगरसारख्या छोट्या शहरातूनही चिमण्या हद्दपार होऊ लागल्या आहेत. सर्वांत मोठे खेडे असा लौकीक असलेल्या नगर शहराची काही खास वैशिष्ट्ये आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शहर व परिसरात असलेली जैवविविधता हे आहे. आजूबाजूच्या टेकड्यांवरून शहराकडे नजर टाकली, तर हिरव्यागार झाडीत लपलेले शहर दिसते. अशी हिरवाई असूनही शहरात चिमण्यांची संख्या कमी होत आहे, असे पक्षीमित्रांचे निरीक्षण आहे.

चिमण्या मानवी वस्तीजवळ राहतात. त्या घरटीही मानवी वस्तीत म्हणजे अगदी घरातही करतात. त्यामुळे चिमण्यांचे इंग्रजी नाव ‘हाऊस स्पॅरो’ (घर चिमणी) असे आहे. चिमण्यांची घरटी घरातील माळ्यावर, अगदी विजेच्या ट्यूबच्या पट्टीवरही आढळतात. चिमण्या रात्री झाडांवर बसत असल्या, तरी घरटी मात्र झाडावर करत नाहीत. अलीकडील काळात म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांत चिमण्यांना घरटी बनवण्याची सुविधा आपण संपवल्याने त्यांचे स्थलांतर होत आहे.

पूर्वी शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या माळीवाडा, नालेगाव, कापडबाजार, सज्रेपुरा, हातमपुरा या भागातही चिमण्यांचे थवे मोठय़ा प्रमाणात दिसायचे. कारण या भागात वस्ती जुनी होती. घरे मातीची व माळवदाची होती. त्यातही मोठे वाडे होते. या वाड्यांत, घरांना बाहेरच्या बाजूने कोनाडे होते. अजूनही काही जुन्या माड्यांवर असे कोनाडे दिसतात. तेथे चिमण्या आपली घरटी करायच्या व त्यात त्यांची नवी पिढी जन्माला यायची. शिवाय जुन्या मातीच्या घरांना बाहेरून चोचीने टोकरून तेथे छोटे बिळ करून घरटे बनवणे चिमण्यांना सहज शक्य असे. हळूहळू ही जुनी मातीची घरे पडून तेथे गुळगुळीत सिमेंटचे प्लास्टर असलेल्या इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे चिमण्यांना घरटी करण्यासाठी जागाच राहिली नाही. सावेडी, प्रोफेसर कॉलनी, पाइपलाइन रोड भागात ज्या नवीन वसाहती उभ्या राहिल्या, त्या तर चिमण्यांचे अस्तित्वच नाकारणार्‍या आहेत. कारण तेथे घरटे बांधण्यासाठी चिमण्यांना जागाच नाही. त्यामुळे चिमण्या आता शहराबाहेर, परंतु कमी विकसित अशा केडगाव, नेप्ती, बुर्‍हाणनगर, बुरूडगाव, कापूरवाडी, नालेगाव, बोल्हेगाव, नागापूर या भागाकडे स्थलांतरित झाल्या आहेत. या भागात अजूनही चिमण्यांचे थवे दिसतात.

भुईकोट किल्ला परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली प्रशासनाने धुडगूस घालण्याआधी खंदकात दाट झाडी होती. त्यावेळी येथे चिमण्यांचे मोठे प्रमाण होते. आता झाडी नष्ट झाली. शिवाय अनेक ठिकाणी सिमेंट लिंपण्यात आले. त्यामुळे किल्ला परिसरातही चिमण्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे.

विशेष म्हणजे नगर शहर व परिसरात कावळे, साळुंक्या, बुलबुल, बगळे हे पक्षी मोठय़ा प्रमाणात दिसतात. गायब झाल्या आहेत त्या फक्त चिमण्या. चिमण्यांसाठी काही केले नाही, तर शहरांतील नव्या पिढीला त्या फक्त चित्रातच दाखवाव्या लागतील.

निसर्गप्रेमींनी प्रयत्न करण्याची गरज
शहरात घरटी करण्यास जागाच राहिली नसल्याने चिमण्यांची वीण होण्यास अडचणी निर्माण झाल्यानेच चिमण्या शहराबाहेर जात आहेत. त्यांना परत येण्यासाठी निसर्गप्रेमींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’
-प्रा. डॉ. सुधाकर कुर्‍हाडे, पक्षी अभ्यासक व मानद वन्यजीव संरक्षक

घरट्यासाठी हवी जागा
उन्हाळ्यात काही जागरूक नागरिक पक्ष्यांसाठी दाणे व पाण्याची व्यवस्था करतात. पण चिमण्या शहरात राहण्यासाठी त्यांना घरटी करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कृत्रिम घरटे बागेत अथवा सुरक्षित ठिकाणी टांगून ठेवल्यास त्यात चिमण्या घरटी करतात, असा अनुभव आहे. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे.

शहरात चिमण्यांची संख्या घटली
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पक्षीगणना केली होती. शहरी भागात 12 ठिकाणी सर्वेक्षण केले. तेथे फक्त 132 चिमण्या आढळल्या. ग्रामीण 79 ठिकाणी सर्वेक्षण झाले. त्यात 1550 चिमण्या आढळल्या. शहरी भागात चिमण्यांची संख्या चिंताजनकरित्या कमी झालेली आढळली. ’’
-जयराम सातपुते, पक्षी अभ्यासक