आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौदा चौकांत होणार ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातीलप्रमुख चौदा चाैकांमध्ये लवकरच ध्वनिक्षेपकावरून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमासाठी छत्तीसगड राज्यातील रायपूरच्या आयडीअल पब्लिक सेफ्टी अँड वेलफेअर सोसायटीने पुढाकार घेतला आहे. पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनीही या उपक्रमासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच नगरच्या चौकांमध्ये सामाजिक जनजागृतीचे बोल कानी पडणार आहेत.

शहरातील वाहनचालकांना सुरक्षित वाहतूक करण्याबाबत जनजागृती, अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना, वाहतूक नियमांचे मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे केले जाणार आहे. आयडीअल पब्लिक सेफ्टी अँड वेलफेअर सोसायटी संस्थेचे कार्यपालन संचालक संदीप धुपार यांनी पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्याशी याबाबत नुकतीच चर्चा केली. जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांचीही त्यांनी भेट घेतली.

यावेळी झालेल्या चर्चेत धुपार यांनी शहरातील स्वयंचलित सिग्नल यंत्रणा असलेल्या एकूण १४ चौकांमध्ये उपक्रम राबवण्यासाठी परवानगी मागितली. ध्वनिक्षेपकावरून जनजागृती करण्यासाठी आयडिअल सोसायटी स्वखर्चाने स्वेच्छेने ही ध्वनिक्षेपक प्रणाली बसवणार आहे. जनहिताचा उपक्रम असल्यामुळे पोलिस अधीक्षकांनी तत्काळ त्याला मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच हा उपक्रम प्रत्यक्षात साकारला जाणार आहे.

दरम्यान, नगर शहरातील अनेक सिग्नल सध्या बंद आहेत. नव्याने बसवण्यात आलेले कायनेटिक चौकातील सिग्नलही बंद अवस्थेत आहेत. नवी योजना सुरु करण्यापूर्वी शहरातील सिग्नलची अवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जनजागृतीसाठी राबवणार अभियान
पत्रकार चौक, प्रेमदान चौक, डीएसपी चौक, जीपीओ चौक, चांदणी चौक, मार्केटयार्ड चौक, इंम्पिरिअल चौक, अप्पू हत्ती चौक, सक्कर चौक, सनफार्मा चौक, कोठला चौक, जुनी महापालिका चौक, कायनेटिक चौक, रेल्वे फाटक गेट येथे हे ध्वनिक्षेपक बसवले जातील. या अभियानांतर्गत वाहतूक नियमांचे मार्गदर्शन, स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, वीजबचत, इंधन बचत, पर्यावरण वाचवा आदीबाबत जनजागृती सेवा लवकरच सुरु होईल. नगरकर त्याचे स्वागत करतील.'' लखमीगौतम, पोलिस अधीक्षक.