आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एनडी पथकां'ची आता उपद्रवींवर करडी नजर, सोमवारपासून कार्यान्वित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरासाठी उपद्रवी ठरणारे नागरिक लहान-मोठ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेचा "एनडी स्क्वॉड' (उपद्रव शोधपथक) तयार झाले आहे. त्यात १४ माजी सैनिकांचा समावेश असून त्यांचे दोन पथके येत्या सोमवारपासून कार्यान्वित होणार आहेत. त्यापूर्वी शुक्रवारी (२४ एप्रिल) उपायुक्त अजय चारठाणकर या माजी सैनिकांची कार्यशाळा घेणार आहेत. शहरासाठी उपद्रवी ठरणाऱ्या प्रत्येकावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकाला देण्यात आले आहेत.
महापालिका उपायुक्त चारठाणकर यांनी नांदेड महापालिकेच्या धर्तीवर या पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येकी सहा माजी सैनिकांची दोन पथके त्यांचे दोन प्रमुख असा चौदाजणांचा यात समावेश आहे. महापालिकेच्या वतीने त्यांना मानधन देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे सर्व अधिकार पथकाला देण्यात आले आहेत. रस्त्यावर अतिक्रमण करणारे, कचरा टाकणारे, अनधिकृतपणे फलक लावणारे, २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरणारे, पार्किंगचे नियम मोडणारे, सार्वजनिक ठिकाणी थंुकणारे अशा सर्वच व्यक्तींवर या पथकाची नजर राहणार आहे. येत्या सोमवारपासून ही पथके कार्यान्वित होतील.

असे पथक आवश्यक

शहरात अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर आहे. चारठाणकर यांनी दोन महिन्यांपूर्वी धडाकेबाज अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. परंतु अनेक भागातील अतिक्रमणे पूर्वपदावर आली आहेत. ही अतिक्रमणे रोखण्याचे प्रमुख काम एनडी पथक करणार आहे. शहराला शिस्त लागावी, यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चारठाणकर हे या पथकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय पथकाच्या दंडात्मक कारवाईस जुमानणाऱ्या संबंधितांवर ते कठोर कारवाईदेखील करणार आहेत.

रोज अहवाल पाहणार

एनडी पथक स्थापन करण्यात आले असून तो सोमवारपासून कार्यान्वित होणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून पथकामधील कर्मचारी दंडात्मक कारवाई करतील. त्याचा दैनंदिन अहवाल ते सादर करणार आहेत. हा अहवाल दररोज तपासला जाईल. गरज पडल्यास आणखी कर्मचारी वाढवण्यात येतील. नागरिकांनी या पथकाला सहकार्य करावे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे सर्वांनीच जबाबदारीने वागावे.'' अजयचारठाणकर, उपायुक्त, मनपा.

नियम तोडल्यास कारवाई

महापालिका अधिनियम १९४९ चे प्रकरण १४ कलम ४, कलम २०८ २४४, तसेच कलम ३७६ नुसार एनडी पथकाला उपद्रवी नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करता येते. रस्त्यावर होणारी अतिक्रमणे, रस्त्यावर थुंकणे, रस्त्यात कोठेही कचरा टाकणे, अनधिकृत फलक, २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर, शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिघात गुटखा विक्री, पार्किंगचे नियम तोडणे, ध्वनिप्रदूषण आदी उपद्रवी ठरणाऱ्या मुद्द्यांचा समावेश आहे.