आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दर्पण’कारांची छबी विशेष टपाल आवरणावर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर -मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक व गाढे अभ्यासक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आठवण जपणारे विशेष टपाल आवरण जामखेड येथील तिकीट संग्राहक पोपटलाल हळपावत यांच्या संग्रहात आहे.मराठीतील पहिले नियतकालिक ‘दर्पण’ आचार्य जांभेकर यांनी 1832 मध्ये सुरू केले. मराठीतील पहिले मासिक त्यांनीच प्रकाशित केले. बाळशास्त्री केवळ पत्रकार नव्हते, मुंबई विद्यापीठातील पहिले एतद्देशीय प्राध्यापक होण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. मराठी, संस्कृत, इंग्रजीसह अन्य आठ भाषा त्यांना अवगत होत्या.

नितीकथा, सार संग्रह, इंग्लंड बखर भाग - 1 व 2, बाल व्याकरण अशी 12 पुस्तकेही त्यांनी लिहिली. बाळशास्त्रींनी मराठी शिक्षणाचा प्रसार केला. मुंबई शिक्षण मंडळाच्या शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयाचे ते संस्थापक संचालक होते. मुंबईमधील काळबादेवी येथे त्यांनी मुलांसाठी पहिले वसतिगृह सुरू केले. पहिले सार्वजनिक ग्रंथालय मुंबई नेटिव्ह लायब्ररीचे ते संस्थापक होते, अशी माहिती हळपावत यांनी दिली.


आचार्य जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 6 जानेवारीला ‘दर्पण दिन’ साजरा केला जातो. या महान व्यक्तीचे कार्य पुढच्या पिढ्यांपुढे राहावे, यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने पाठपुरावा केल्यानंतर भारतीय डाक विभागाने (महाराष्ट्र व गोवा सर्कल) 19 सप्टेंबर 2012 रोजी विशेष आवरण प्रकाशित केले. त्यावर जांभेकरांचे रंगीत चित्र आहे. दर्पण दिनानिमित्त हे फर्स्ट डे कव्हर सर्वांना बघता येईल...

नगरच्या संग्रहालयात पुस्तक
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक विषयांवर पुस्तके लिहिली. त्यातील एक पुस्तक नगर येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात उपलब्ध आहे. हे पुस्तक अतिशय जीर्ण झाले असून अशा दुर्मिळ पुस्तकांचे मायक्रोफिल्मिंग किंवा स्कॅनिंग होण्याची नितांत आवश्यकता आहे.