नगर - जिल्ह्यात कपाट घोटाळ्यानंतर चर्चेत आलेल्या टँकरच्या महाघोटाळ्यावरून जिल्हा परिषदेत खलबते सुरू आहेत. यासंदर्भात विशेष सभा बोलावून पुन्हा चौकशी लावण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने टंचाई निवारणार्थ मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तहसीलदार गटविकास अधिकारी स्तरावर पाहणी करूनच टँकरचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार मंजूर खेपांची व्यवस्थाही प्रशासनाने केली. मंजुरीचा अधिकार महसूल प्रशासनाकडे असला, तरी महत्त्वाची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे होती. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मंजूर खेपांपैकी दररोज काही खेपा होत नव्हत्या, ही वस्तुस्थिती आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली असली, तरी हा विषय चिघळला आहे. टँकरची बिले अदा करताना ऑडिट करूनच उर्वरित ३० टक्के रक्कम देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. तथापि यापूर्वी अदा झालेल्या ७० टक्के बिलांचे काय? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. महिनाभरापूर्वी स्थायी समितीच्या सभेत टँकर घोटाळा झाल्याचा आरोप सदस्य पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी गटविकास अिधकाऱ्यांना सदस्यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले. पण आठवडाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी या अहवालाचीच चिरफाड केली. जीपीएस यंत्रात केलेला हस्तक्षेप, खेपा कमी झालेल्या असतानाही मंजूर खेपांची बिले काढण्याचा प्रयत्न यासह विविध मुद्द्यंावर आक्षेप घेण्यात आला होता. परंतु, गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल बोगस असल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.
सभेत या विषयावरून गोंधळ निर्माण झाला. गटविकास अधिकाऱ्यांना का बोलावले नाही यावरूनच सदस्यांनी त्यांना बोलावून घ्या, तोपर्यंत सभा सुरू ठेवा, असा आग्रह धरला. त्यानंतर अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी यासंदर्भात विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, या बैठकीची तारीख निश्चित झाली नाही. विशेष सभा घेऊन टँकर घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लावण्यात येणार आहे. तत्पूर्वी अध्यक्ष गुंड गटविकास पुढील आठवड्यात बैठक घेणार आहेत. त्यानंतरच सभा बोलावली जाणार असल्याची माहिती समजली.
आैषधांचा प्रश्नही ऐरणीवर
स्थानिकपातळीवर डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराची साथ पसरली आहे. डास नियंत्रणात अपयश येत असताना आैषधेही मुबलक उपलब्ध नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे विशेष सभेत आरोग्य विभागाचाही आढावा घेतला जाणार आहे.
चार दिवसांत बैठक
^टँकर घोटाळ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवण्यात येणार आहे. त्यापूर्वी मी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्याबरोबरच आरोग्य विभागाचाही आढावा घेतला जाणार आहे. त्याची तारीख चार दिवसांत निश्चित केली जाईल.'' मंजूषागुंड, अध्यक्ष, जिल्हा परिषद.