आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई’ आहे, पण ‘श्याम’ हरवलाय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- घड्याळाचे काटे फिरवून काही वर्षे मागे गेल्यास त्याकाळची मुले आई-वडिलांना जिवापाड जपायची, पण आजची परिस्थिती उलट आहे. काळाच्या ओघात कौटुंबिक मूल्ये बदलत आहेत. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ सर्वांना परिचित आहे. आजच्या काळातील आई वृद्धार्शमात दिवस काढत आहे. तिच्या नशिबी सतत लाडक्या ‘श्याम’ची प्रतीक्षा कायम आहे. शहरातील भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रमातील व्यवस्थापक टी. के. गुगळे तेथील वृद्धांची सेवा करतात. हाच माझा ‘श्याम’ आहे, असे सांगताना वृद्ध मातांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरीही, नाही म्हणवत नाही’ या कवी फ. मुं. शिंदे यांच्या कवितेच्या ओळी खूप काही सांगून जातात. मूल आणि आई यांच्यातील रेशीम नाते सर्वाधिक जवळचे मानले जाते. आजतागायत आईने हे नाते, हळूवार जपले. पण तिच्या मुलाला या नात्याचा विसर पडल्याची पदोपदी प्रचिती येते. आयुष्यभर जिवाचे रान करून मुलाला लहानाचे मोठे करणार्‍या आईची दृष्टी धूसर झाली की, मुलांना तिची अडचण होते. तारुण्याच्या धुंदीत असलेली तरुणाई आपणही उद्या आई किंवा वडील होणार आहोत, हे विसरल्याचे येथील मातांशी झालेल्या संवादातून जाणवते. ठिकठिकाणी वृद्धाश्रमे सुरू करण्याची गरज भासणे, हे समाज व कुटुंब व्यवस्थेला जडलेल्या असाध्य आजाराचे लक्षण आहे. नगर शहरात दोन वृद्धाश्रम आहेत. नगर-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या भाऊसाहेब फिरोदिया वृद्धाश्रमाला ‘दिव्य मराठी’ टीमने शनिवारी भेट देऊन तेथील मातांशी संवाद साधला. ठकुबाई शिंदे म्हणाल्या, मुलगा दोन वर्षांचा असताना मी नगरला आले. धुणी-भांडी केली. त्या वेळी दोन रुपये रोजाने काम करून संसाराचा गाडा ओढला. मुलाने खूप शिकावे, ही इच्छा होती. पण, तो नववीपर्यंत शिकला. त्याचे लग्न करून दिले. नातवंडे आहेत, पण कौटुंबिक कलहाला मी कंटाळले. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात यावे लागले. कुणाकडून काही अपेक्षा नाही. त्यामुळे आता उर्वरित दिवस येथे काढतेय, असे सांगताना शिंदे यांचे डोळे पाणावले. मुलांवर संस्कार करताना ज्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे नेमके तिथेच दुर्लक्ष होताना दिसते. आमची व्यथा कशाला विचारता? काही दु:खांवर उपाय नसतात. ते फक्त भोगायचे असतात. प्रसंगी त्यांची उणी-दुणी सोसून चांगले कर्म करण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया इतर महिलांनी व्यक्त केल्या. त्यांना आपले दु:ख जाहीर करावे वाटत नाही. कारण, त्यामुळे पुन्हा त्यांचा ‘श्याम’ दुखावण्याची भीती त्यांच्या बोलण्यातून ठळकपणे जाणवते.

.. आता वृद्धाश्रमे नकोत
जोपर्यंत मनगटात ताकद होती, तोपर्यंत खूप कष्ट करून मुलांचे संगोपन केले. हात-पाय थकल्यानंतर वृद्धापकाळात कमावता येत नाही. त्या वेळी मुलांची गरज संपते. मग हीच मुले आई-वडिलांना अडगळीला फेकून देतात. समाजातील ही विदारक प्रवृत्ती पाहून मन सुन्न झाले आहे. प्रत्येकाने आई-वडिलांचा वृद्धापकाळातही सांभाळ केल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. झाले ते पुष्कळ, बस्स आता वृद्धाश्रमे नकोत एवढीच देवाजवळ प्रार्थना करतो.’’ टी. के. गुगळे, व्यवस्थापक (वृद्धाश्रम)

नेटाने संसार केला
पती किराणा दुकानात कामाला होते. मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नातून संसार केला. मुलांना लहानाचे मोठे केले. कौटुंबिक वाद-विवाद झाले होते. त्यामुळे कंटाळून वृद्धार्शम गाठले. मुलाचा आजही माझ्यावर खूप जीव आहे. तो मला नेहमी भेटायला येतो. येथे वृद्धाश्रमातही काही कमी नाही. व्यवस्थापक मुलाच्या मायेने जपतात. याचेच कौतुक वाटते. सहकारी महिलांमध्ये मन रमते. त्यामुळे मुलाचा आग्रह असतानाही परतावेसे वाटत नाही.’’ पार्वती गारुळे, वृद्धाश्रमातील एक माता.