आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Talk With Anna Hazare : All Election Unconstitutional

अण्णा हजारे यांच्याशी खास बातचीत: आजवरच्या सगळ्या निवडणुका घटनाबाह्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राळेगणसिद्धी - स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुका घटनाबाह्य आहेत. कारण आपल्या घटनेत राजकीय पक्षांना स्थानच नाही. आपली सध्याची लोकशाही म्हणजे काही पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी राबवलेली शासनव्यवस्था आहे.जोपर्यंत खरी लोकशाही येत नाही, तोपर्यंत देशाला भवितव्य नाही, असे मत अण्णा हजारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना अण्णा म्हणाले, देशातील राजकीय व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटण्याचे कारण काही राजकीय पक्षांच्या हाती ती सामावली आहे. पैशांसाठी सत्ता व सत्तेतून पुन्हा पैसा मिळवणे, हे ध्येय या पक्षांचे असल्याने ख-या अर्थाने लोकशाहीचा सामान्यांना फायदा झालेला नाही. त्यामुळे गरीब-श्रीमंत दरी दूर करण्याच्या उद्दिष्टापासून आपण दूर जात आहोत. मूठभर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरिबांची गरिबी वाढत आहे. हे थांबवण्यासाठी व्यवस्थेचे प्रतिनिधी थेट जनतेतून व कोणत्याही पक्षाशिवाय निवडून जाण्याची गरज आहे. हे उमेदवार चारित्र्यसंपन्न असतील. व्यवस्थेतील दोष दाखवताना अण्णा म्हणाले, लोकांशी फक्त मतदानापुरता संबंध असलेल्या सध्याच्या व्यवस्थेत जनहिताचे कायदे तयार होत नाहीत. कायदेही सत्तेत असलेला एक राजकीय पक्ष तयार करतो व तो मंजूरही करवून घेतो.
तरुणांच्या जागृतीची गरज
तरुण निवडणूक व्यवस्थेचा गुलाम होतोय. निवडणुकीत तरुणांच्या या टोळ्या ज्या पद्धतीने नेत्यांच्या मागे धावतात, हे चित्र बदलण्याची गरज आहे. तरुणांमध्ये ख-या अर्थाने लोकतंत्राचे शिक्षण देण्याची गरज आहे, असे अण्णा म्हणाले.
पवार व लालूंचा दबाव
सध्याच्या लोकशाहीत शरद पवार व लालूप्रसाद यादव यांच्यासारखी मूठभर खासदार पदरी असलेली माणसे 125 कोटी लोकांसाठी असलेल्या व्यवस्थेवर दबाव आणतात व हवे ते पदरात पाडून घेतात, असेही अण्णा म्हणाले.
काँग्रेस-भाजपचा सूर एकच : आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जनलोकपालसाठी काँग्रेस व भाजपचे लोक एका सुरात बोलत आहेत. यामागे त्यांचा जनतेची दिशाभूल करण्याचा डाव असल्याचा संशय आहे. अधिवेशनात विधेयक आणायचे, कोणीतरी त्यावर गोंधळ घालून मंजूर होऊ द्यायचे नाही, मग हे पुन्हा आम्ही विधेयक आणले होते. पण मंजूर होऊ शकले नाही, असे म्हणायला मोकळे होतील, अशी भीती अण्णांनी व्यक्त केली.