आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Guide Sudhir Chapalgaonkar News In Marathi, Divya Marathi

‘त्या’ विद्यालयांवर कारवाईची शिफारस करणार : चपळगावकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - शालेय क्रीडा स्पर्धांत अनेक माध्यमिक विद्यालये सहभाग घेत नाहीत. विद्यालयाच्या या भूमिकेने चांगल्या खेळाडूंना क्षमता असूनही सहभागी होता येत नाही. त्यामुळे स्पर्धेत सहभागी न होणा-या विद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करू, असा इशारा क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांनी दिला.

येत्या पाच ऑगस्टपासून शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे. तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनाची बैठक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूराव होळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी चपळगावकर यांनी हा इशारा दिला.

तालुक्यात अनेक गुणवंत खेळाडू ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यानेच त्यांची गुणवत्ता पुढे आली आहे. पारनेर तालुक्यात सुमारे सत्तर माध्यमिक विद्यालये असताना अवघ्या दहा ते पंधरा शाळाच यात सहभागी होत आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्रात गुणवंत खेळाडू असल्यास ते वंचित राहतात. याचे नुकसान विद्यार्थ्यांसह पालकांना होत असल्याने त्यांनी मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक व पालक यांनी एकत्रितपणे
यात लक्ष देऊन सहभाग वाढवला पाहिजे, असे चपळगावकर म्हणाले.

होळकर म्हणाले, पारनेर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांना पाच ऑगस्टपासून सुरुवात होत आहेत. पारनेर तालुका क्रीडा संकुलावर या खो-खो, कबड्डी, मैदानी स्पर्धा होणार आहेत. व्हॉलिबॉल स्पर्धा सेनापती बापट विद्यालय पारनेर व कुस्ती पारनेर महाविद्यालयात होणार आहे. यावर्षीपासून उशिरा येणा-या संघांना बाद ठरवले जाणार आहे. स्वागत न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उषा रोहोकले यांनी केले.

यावेळी दिलीप दुधाडे, सुनील गायकवाड, बाळासाहेब मते, बाबाजी शिंदे, शाहूराव औटी, दत्तात्रय औटी, बाबुराव औटी, महादेव साबळे, बाळासाहेब गाडेकर, रविशंकर मोरे, एकनाथ आंबेकर, दत्तात्रय उंडे आदी उपस्थित होते.