आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्पोर्ट पायलट’मुळे ढूस आता आंतरराष्ट्रीय पायलट,हंगे‍रीत होणा-या स्पर्धेत घेणार सहभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अतिशय मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्या अप्पासाहेब ढूस यांना नुकताच आंतरराष्ट्रीय पायलट परवाना मंजूर झाला. त्यामुळे ‘पॉवर पॅराग्लायडिंग’च्या जागतिक स्पर्धेत सहभाग घेण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्पर्धेत ढूस भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा ऑगस्ट महिन्यात हंगेरीत होणार आहे.


ढूस यांनी थायलंडमध्ये 16 ते 24 जानेवारी 2013 मध्ये झालेल्या ‘पॉवर पॅराग्लायडिंग’ (पॅरामोटर) या हवेतील साहसी क्रीडा प्रकाराच्या जागतिक स्पर्धेचे पूर्वतयारी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. त्यामुळे ‘रॉयल एरोनॉटिक स्पोर्टस् असोसिएशन ऑफ थायलंड’ या युरोपमधील ‘फेडरेशन ऑफ एअरोनॉटिक इंटरनॅशनल’ या संस्थेची मान्यता असलेल्या संस्थेने ढूस यांच्या यशस्वी प्रशिक्षणाबद्दल त्यांना ‘टी. एच. ए. 1331’ या क्रमांकाने आंतरराष्ट्रीय ‘स्पोर्ट पायलट’ हा परवाना मंजूर केला आहे.


पायलट म्हणून मिळालेल्या या परवान्यामुळे ढूस हे आता ‘फेडरेशन ऑफ एअरोनॉटिक इंटरनॅशनल’ या युरोपस्थित संस्थेचे मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय पायलट ठरले आहेत. त्यांना नुकतीच ई-मेलद्वारे या परवान्याची प्रत प्राप्त झाली. हा परवाना प्राप्त करण्यासाठी ढूस यांना डेव्हिड ग्राऊप्यारा (थायलंड) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनीच ढूस यांना दहा दिवसांचे ‘पॉवर पॅराग्लायडिंग’ या साहसी क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिले होते. युके येथील पॉल डेकीन यांचेही ढूस यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.


जुळला दुग्धशर्करा योग
अप्पासाहेब ढूस यांना मंगळवारी (11 फेब्रुवारीला) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याच्या दोन दिवस आधीच ढूस यांना आंतरराष्ट्रीय पायलट परवाना मिळाला. या दोन्ही आनंदाच्या गोष्टींमुळे जिल्ह्यासाठी हा दुग्धशर्करा योग जुळून आला असल्याची प्रतिक्रिया ढूस यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.


शासनाकडून माफक अपेक्षा
जागतिक पॅरामोटर स्पर्धा 9 ते 16 ऑगस्ट या कालावधीत हंगेरीमध्ये होत आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. परंतु या स्पर्धेच्या तयारीसाठी माझ्या हातात केवळ 5 महिने उरले आहेत. आंतरराष्ट्रीय परवाना मिळाला असल्यामुळे निदान आता, तरी शासनाच्या राज्य क्रीडा विकास निधीतून मला या साहसी क्रीडा प्रकारासाठी आवश्यक असलेले साहित्य मिळेल, अशी माफक अपेक्षा आहे.’’ अप्पासाहेब ढूस, शिवछत्रपती पुरस्कार विजेते.