आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग तीनमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - श्रीगोंदे नगरपालिका निवडणुकीत प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण महिला गटातील काँग्रेस उमेदवारीचा घोळ सुटण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलल्याने उमेदवारी नाकारलेल्या शोभा ढवळे या ‘नॉट रिचेबल’ झाल्या आहेत.

प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी काँग्रेसने ढवळे यांना पक्षाचा ‘ए’ फॉर्म अर्जासोबत दिला होता. दरम्यान, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंदाकिनी शेळके यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे या प्रभागातील संदर्भच बदलले. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या गयाबाई सुपेकर यांनीही राष्ट्रवादीला रामराम करत काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. काँग्रेसने त्यांना ‘बी’ फॉर्म दिला. छाननीच्या वेळी हरकतीनंतरही सुपेकर यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. दरम्यान, छाया ढवळे यांना उमेदवारी नाकारून गयाबाई सुपेकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसपुढे तांत्रिक अडचणी उभ्या ठाकल्या. ‘ए’ फॉर्म असल्याने ढवळे यांचीच पक्षाचे अधिकृत म्हणून नोंद झाली. ढवळे यांनी माघार घ्यावी, यासाठी काँग्रेस नेत्यांनी त्यांचे घर गाठले. ढवळे मात्र अज्ञातस्थळी निघून गेल्या. मोबाइल ‘नॉट रिचेबल’ होता. विरोधी गटाने त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची चर्चा होती. ढवळेंनी माघार न घेतल्यास सुपेकरांनी अर्ज मागे घेण्याचा इशारा काँग्रेस नेत्यांना दिला आहे. एकंदर या जागेसाठीचा तिढा काँग्रेसमध्ये वाढतच आहे.