आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srigonda Pilgrims Safe Return From Uttarakhand Flood

हा तर आमचा पुनर्जन्म, गौरीकुंड येथून पतरलेल्या भाविकांच्या भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - जीवन, मृत्यू यांच्यात पुसटसे अंतर उरले होते. यातून बाहेर पडण्याची अंधुकशी आशादेखील संपली होती. आता मृत्यू अटळ आहे, असे चित्र असताना आम्ही नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. हा तर आमचा पुनर्जन्म आहे, अशा शब्दांत उत्तराखंड येथून परतलेल्या रामभाऊ साळुंके महाराज व अन्य भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

साळुंके यांच्या नागनाथ यात्रा कंपनीतर्फे चारधाम यात्रेसाठी गेलेले श्रीगोंदे तालुक्यातील 57 भाविकांचे एक पथक उत्तराखंडच्या प्रलयात अडकले होते. या सर्वांना बारा दिवसांनंतर सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर उर्वरित यात्रा पूर्ण करीत हे भाविक सोमवारी (1 जुलै) श्रीगोंद्यात दाखल झाले. काष्टी (ता. र्शीगोंदे) येथे त्यांचे स्वागत साईकृपा उद्योग समूहाचे प्रमुख सदाशिव पाचपुते यांच्या वतीने करण्यात आले. मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्यानंतरदेखील न डगमगता त्यांनी उर्वरित देवदर्शन पूर्ण करीत र्शीगोंदे गाठले. त्यांना भेटण्यासाठी निकटवर्तीय व कुटुंबीयांची गर्दी ठिकठिकाणी उसळली होती.

यात्रेतील अनुभवाविषयी साळुंके महाराज म्हणाले, निसर्गाचा आक्रोश व मृत्यूचे तांडव आम्ही डोळ्यादेखत पाहिले. ते दृश्य आठवले की, आजही अंगावर काटा येतो. केदारनाथ येथे आम्ही ज्या हॉटेलात मुक्कामी होतो, तेथून आम्हाला पंधरा जून रोजी बाहेर जाण्यास सांगण्यात आले. सुरक्षित ठिकाणी म्हणून आम्ही टेकडीच्या दिशेने निघालो. तेवढय़ात मोठा लाटेचा प्रपात रोरावत आला. आम्ही नुकतेच खाली केलेले हॉटेल त्याने गिळंकृत केले. हे दृश्य आठवले, की जगण्या-मरण्यातील फरक समोर उभा ठाकतो. सुरक्षित ठिकाण म्हणून गौरीकुंडला पोहोचलो. परंतु ते किती असुरक्षित आहे, हे तेथे गेल्यावर कळले. कोसळणारा धो-धो पाऊस, रात्रीची कडाक्याची थंडी, विखुरलेले मृतदेहांचे ढीग, स्वत:च्या जगण्याची हमी नाही, अन्न-पाण्याची ददात, आप्तेष्टांपासून शेकडो मैल दूर अशा भीषण वातावरणाशी सामना करताना फक्त परमेश्वराचा धावा करणे एवढंच आमच्या हाती होते. सुदैवाने आमच्यातील कोणीही दगावले नाही. दहा दिवसांनंतर आम्ही सुखरूप पोहोचलो. लष्करी जवानांनी वृद्ध व अस्वस्थ यात्रेकरूंना गौरीकुंडावरून हवाईमार्गाने बाहेर काढले.

हरिद्वारला पोहोचल्यानंतर हायसे वाटले. परंतु येथून बाहेर पडण्याची चिन्हे दिसेना. पाऊस, खचलेले रस्ते, मृतदेहांची पसरलेली दुर्गंधी व मदत कार्यासाठीची अनावर गर्दी यामुळे पुन्हा एकदा नवे संकट आल्याचा भास झाला. दोन आठवड्यांनंतर मृत्यूशी झुंज देत आमचे दूष्टचक्र संपले. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी आम्ही उर्वरित यात्रा पूर्ण केली. हा आम्हा सर्वांचा पुनर्जन्म असल्याची भावना साळुंके महाराज यांनी यावेळी व्यक्त केली.

बॅटर्‍यांमुळे मिळाला धीर
आम्ही प्रवासात मोबाइलच्या चार- पाच बॅटर्‍या चार्ज करून ठेवल्या होत्या. गौरीकुंडात अडकल्यानंतर बाह्यजगताशी संपर्क साधण्याकरिता या बॅटर्‍यांचा उपयोग झाला. आम्ही कोणत्या संकटात आहोत. हे माध्यमांना समजले. आम्ही निकटवर्तीयांशी संपर्क साधून होतो. त्यांच्या दिलाशामुळे जगण्याची उमेद वाढली. या बॅटर्‍यांनी आम्हाला धीर मिळाला होता.’’ दत्तात्रय साळुंके महाराज, यात्रेकरू.