आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला नगरसेवकांचा आवाज दडपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप करून विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. त्यामुळे ही सभा गोंधळात पार पडली.

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष रार्जशी ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत एकूण 32 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, सभेत चर्चेसाठी ठेवलेल्या विषयांची माहिती दिली जात नाही, पुरवणी अजेंड्याच्या नावाखाली महत्त्वाच्या विषयांना ऐनवेळच्या विषयात घालून चर्चा टाळली जाते, असा आरोप विरोधी नगरसेविका भारती कांबळे, मंजुश्री मुरकुटे, प्रमिला मुळे यांनी केला. मात्र, हे विषय आधीच दिले असल्याचे सत्ताधारी पदाधिकार्‍यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहराच्या गटार योजनेसाठी 64 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष रार्जशी ससाणे यांनी यावेळी दिली. सत्ताधारी नगरसेवक राजेश अलघ यांनी गोंधवणी रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न सभेत उपस्थित करून सत्ताधार्‍यांना ‘घरचा आहेर’ दिला.

बाजारतळावरील नियोजित वाहनतळावर सशुल्क वाहनतळाची योजना राबवण्याची मागणी नगरसेवक संजय फंड यांनी केली. बाजारातील अनेक दुकानदार ओट्यांऐवजी रस्त्यावर दुकाने थाटतात. याचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होतो. नगरपालिका कर्मचार्‍यांनी दुकानदारांना शिस्त लावावी. नगरपालिकेच्या जलतरण तलावाजवळील गोंड समाजाच्या लोकांनी केलेली अतिक्रमणो तातडीने हटवावीत, अशी मागणी नगरसेवक संजय छल्लारे यांनी सभेत केली.

शहरातील काशीविश्वेश्वर रस्त्यावर डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी शिक्षण समितीचे सभापती श्रीनिवास बिहाणी यांनी केली.

सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांबरोबरच सत्ताधारी नगरसेवक राजेश अलघ, संजय फंड व श्रीनिवास बिहाणी यांनी शहरातील अतिक्रमणे, स्वच्छता, रस्त्यांचे डांबरीकरण व वाहनतळाचा प्रश्न उपस्थित करून सत्ताधारी नगराध्यक्ष ससाणे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात ससाणे यांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. या सभेस सर्व नगरसेवक उपस्थित होते.