आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी आगारात ‘पंचसूत्री’ चा बट्टयाबोळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्य परिवहन महामंडळातर्फे काही दिवसांपूर्वी कामकाजात सुधारणा होण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम घोषित करण्यात आला. मात्र, त्याबाबत नगरच्या आगाराने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने या कार्यक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे. शहरातील तीनही बसस्थानक परिसरात घाण पसरली आहे. प्रवाशांना सुविधा तर मिळत नाहीतच, उलट प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेत कर्मचारी वाहने लावतात. बसस्थानक परिसरातील पोलिस मदतकेंद्र बेवारस पडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कामात सुसूत्रता यावी यासाठी परिवहन महामंडळातर्फे पंचसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यात स्वच्छ बसस्थानक, वक्तशीर सेवा, प्रवाशांना सन्मानाची वागणूक देणे आदींचा समावेश आहे. शहरातील एकाही बसस्थानकात यातील एकाही सूत्राचा अवलंब केला जात नाही. तीनही बसस्थानकांत सुविधांचा पार बोजवारा उडाला आहे. स्वच्छता व सुरक्षेबरोबर प्रवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानकावर दिवे, पिण्याचे पाणी, सुरक्षेसाठी पोलिस मदत केंद्र यासारख्या प्राथमिक सुविधांची आवश्यकता असते. प्रवाशांना या सुविधा मिळत नाहीत.
तीनही बसस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. काही प्रवाशांना रात्री बसची वाट पहात थांबावे लागते. अशावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकावर एकतरी पोलिस असण्याची गरज असते. मात्र, तीनही बसस्थानकांवर अपवादानेच पोलिस सापडतात. त्यामुळे रात्री बसस्थानकावर थांबणे प्रवाशांना गैरसोयीचे ठरत आहे. वक्तशीर सेवा हे सूत्र तर आगाराकडून अक्षरश: पायदळी तुडवले जात आहे. काही अपवाद वगळता एकही बस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा बसची तासन् तास वाट पाहात थांबावे लागते.
शेडमध्येच पार्किंग - स्वस्तिक बसस्थानकात पुण्याकडे जाणा-या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तथापि, तेथे प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. ज्या सुविधा आहेत, त्यांचाही वापर प्रवाशांना करता येत नाही. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेत बिनदिक्कतपणे वाहने लावली जातात. त्यामुळे प्रवाशांना शेडऐवजी उघड्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. या प्रकाराकडे आगारातील वरिष्ठ अधिका-यांचे लक्ष नाही.
पाठपुरावा चालू - तारकपूर बसस्थानकात प्रवाशांची रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असून त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची आवश्यकता आहे. यासाठी आगाराने बसस्थानकात पोलिस मदतकेंद्र उभारले. परंतु या मदतकेंद्रात पोलिस हजर राहत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात पोलिस विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, बसस्थानकात गस्त घालण्यासाठी अद्यापि पोलिस मिळाले नाहीत.’’ - प्रमोद जगताप, आगार व्यवस्थापक, तारकपूर.
पोलिस मदत केंद्रच बेवारस - तारकपूर बसस्थानकातील पोलिस मदतकेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बेवारस आहे. एवढ्या मोठ्या बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकतरी पोलिस असायला हवा. बसस्थानकात पोलिस मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, तेथे पोलिस थांबतच नसल्याने हे केंद्र धूळखात पडले आहे. त्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. या बसस्थानकातील चो-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात स्वच्छतेचा बोजवारा - मध्यवर्ती बसस्थानकात ग्रामीण भागातील प्रवासी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज हजारो प्रवासी या बसस्थानकात असतात. बसस्थानक परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शौचालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. बसची वाट पाहत थांबलेल्या व बसमधून उतरणा-या प्रवाशांना नाक मुठीत धरावे लागते. प्रवाशांनी अनेकदा तक्रार करूनही हा कचरा उचलला जात नाही.