आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांच्या संपानंतर एसटीची चाके पुन्हा फिरू लागली, नगरमध्‍ये सर्व बस पूर्ववत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चार दिवसांच्या संपानंतर एसटीची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप शुक्रवारी रात्री बारा वाजता मागे घेण्यात आला. संपामुळे चार दिवस एसटीची एकही बस रस्त्यावर धावली नव्हती. मात्र शनिवारी सकाळपासून एसटी बस रस्त्यावर धावू लागल्या. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यातील एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. संप मिटल्याचे कळताच प्रवाशांनी शहरातील तिन्ही बसस्थानकांवर गर्दी केली.
 
गेल्या चार दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर हजर व्हावे, असे आदेश न्यायालयाने देताच सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर झाले. संप मागे घेत असल्याचे कर्मचारी संघटनेने जाहीर करताच शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच बससेवा पूर्ववत सुरू झाली. माळीवाडा, तारकपूर, तसेच पुणे बसस्थानक गेल्या चार दिवसांपासून अगदी ओस पडले होते.
 
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे नगर शहर जिल्हाभरातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. ऐन सणासुदीच्या काळात हा संप सुरू झाल्याने या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. ट्रक, जीप, कार मिळेल त्या वाहनाने जास्तीचे भाडे देऊन प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले. त्यानंतर शहर, तसेच जिल्ह्यातील सर्व आगारांतील बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. संपकाळात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. आता ही सेवा पूर्ववत सुरू झाली असून प्रवाशांची गैरसाेय होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही एसटीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
बातम्या आणखी आहेत...