आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाला मिळणार साडेतीन कोटींचे उत्पन्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटनाला जाण्याचे वेध नगरकरांना लागले आहेत. उन्हाची काहिली वाढल्याने थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा बेत अनेकांनी आखला आहे. सुट्या व लग्नसराईमुळे शहरातील बसस्थानकांवर गर्दी वाढली आहे. नगर येथून 13 जादा बसेस सोडण्यात येत आहेत. वाढत्या प्रवाशांमुळे ऐन दुष्काळात एसटीला यंदा साडेतीन कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी एसटीला 2 कोटी 70 लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

एप्रिलच्या पहिल्या, दुसर्‍या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या. 1 मे रोजी निकाल लागले. उन्हाळ्याची सुटी कुठे घालवायची यासाठी अनेकांनी मागील तीन महिन्यांपासून नियोजन केले होते. उन्हाळ्याची सुटी कोकणात, मनालीला, तसेच काश्मिरमध्ये घालवण्याकडे सर्वाधिक कल आहे. आंतरराज्य पर्यटनही वाढले आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसगाड्यांचे नियोजन केले आहे. नगर हे राज्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. जिल्ह्यात शिर्डी व शनिशिंगणापूर ही दोन महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. तेथे येणार्‍यांची संख्या वाढली आहे.

नगर शहरातील तिन्ही बसस्थानकांमधून दररोज 1 लाखाहून अधिकजण प्रवास करतात. त्यातून महामंडळाला दरवर्षी एक कोटीहून अधिक उत्पन्न मिळते. सुटीमुळे होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने जादा बसचे नियोजन केले आहे. प्रवाशांसाठी जादा 13 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मेपासून उत्पन्नात वाढ
शुक्राच्या अस्तामुळे एप्रिल महिन्यात विवाह मुहूर्त कमी होते. त्यामुळे एसटीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात कमी झाले होते. मे महिन्यात लग्नतिथी बर्‍याच आहेत. पुढील काळात एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल.

वनवास कधी संपणार?
दरवर्षी 50 लाखांचे उत्पन्न देणार्‍या नगर शहरातील माळीवाडा, तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली आहे. सर्वाधिक वाईट अवस्था माळीवाडा बसस्थानकाची आहे. या बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अशीच परिस्थिती स्वस्तिक चौक बसस्थानकाची आहे. या बसस्थानकांचा वनवास कधी संपणार आहे?
- रावसाहेब पवार, प्रवासी.

45 चालकांची भरती
यापूर्वी नगर एसटी आगारात चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने एसटी बसगाड्यांचे नियोजन कोलमडत होते. आता 45 चालकांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीची सेवा निश्चितच सुरळीत होईल.
- पी. के. नेहूल, आगारप्रमुख, माळीवाडा बसस्थानक.