आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सावेडीतील तहसील कार्यालयानजीक असलेल्या सेतू कार्यालयात गर्दी केली आहे. प्रतिज्ञापत्रासाठीचे मुद्रांक व दाखला मागणीच्या अर्जावर लावण्यासाठीचे कोर्ट फी स्टँप सेतू कार्यालय, तसेच तहसील कार्यालयाबाहेरील दुकानात उपलब्ध नाहीत. ते मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांना पायपीट करावी लागत आहे.
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, तसेच शैक्षणिक शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेतानाच विविध दाखले जमा करावे लागतात. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात, उत्पन्न, रहिवासी आदी दाखल्यांची आवश्यकता असते. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही रहिवासी, उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो. हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे.
तहसील कार्यालयासमोरील महापालिकेच्या संकुलात असलेल्या सेतू कार्यालयात सोमवारी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास सेतू कार्यालय व परिसरातील दुकानांमधील कोर्ट फी स्टँप व मुद्रांक संपले. शहर व तालुक्यातून आलेल्या विद्यार्थी व पालकांची त्यानंतर स्टँपसाठी शोधमोहीम सुरू झाली. सिव्हिल हडको येथील एस. एस. गांधी यांच्या जनरल स्टँप दुकानात मुद्रांक उपलब्ध असल्याने त्यांची अडचण दूर झाली. मात्र, गर्दी झाल्याने बराच वेळ रांगेत थांबण्याची वेळ त्यांच्यावर आली.
सेतू कार्यालयातच आवश्यक ते स्टँप उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. दहावी, बारावी व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनाही दाखल्यांची आवश्यकता असते. त्या विद्यार्थ्यांनीही दाखल्यासाठी गर्दी केली आहे.
जिल्हाधिकार्यांचा आदेश कागदावरच
आवश्यक दाखले शाळेतच उपलब्ध करून देण्याचा आदेश या आधीचे जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी दिला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने विद्यार्थ्यांवर दाखल्यांसाठी गर्दी करण्याची वेळ आली आहे.
वेळ वाया जातो
कॉलेजच्या कामासाठी मुद्रांक आवश्यक होता. मात्र, सेतू कार्यालय व परिसरात मुदं्राक उपलब्ध नव्हते. तासभर शोध घेऊनही मुद्रांक मिळू शकला नाही. सिव्हिल हडकोतील दुकानात उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्याने येथे आले. अध्र्या तासापासून रांगेत उभी आहे. विनाकारण वेळ वाया जात आहे. -प्रणिता कानडे, विद्यार्थिनी, विखे अभियांत्रिकी.
विनाकारण मन:स्ताप
स्टँप उपलब्ध नाहीत, शेजारच्या दुकानातून घ्या असे तेथे सांगण्यात आले. संबंधित दुकानातही ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्रास सहन करावा लागला.
- बाबासाहेब वाव्हळ, विद्यार्थी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.