आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रांकाच्या तुटवड्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्यादहा दिवसांपासून शंभर रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोट्यवधींचे जमीन वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. काही ठिकाणी मुद्रांकांची जास्त दराने विक्री होत असून, नाईलाज म्हणून नागरिक ते खरेदी करत आहेत.
बांधकाम व्यावसायिकांना घर नावावर करून देण्यासाठी, शासकीय दस्तासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी हमीपत्र, प्रतिज्ञापत्र, बँकांना देण्यासाठी, तसेच वाहन खरेदी करण्यासाठी मुद्रांकाची गरज असते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दहा-पंधरा मुद्रांक विक्रेते मुद्रांक विकतात. याशिवाय शहर परिसरातही मोठ्या संख्येने मुद्रांक विक्रेते आहेत. जिल्हा न्यायालय, तहसील कार्यालय, तसेच सहायक निबंधक कार्यालय परिसरातही मुद्रांकाची विक्री केली जाते. मात्र, तेथील बहुतेक मुद्रांक विक्रेत्यांकडे गेल्या दहा दिवसांपासून मुद्रांक उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुद्रांकाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुद्रांक नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबर बांधकाम व्यावसायिक, व्यापारी पालकांना किमतीपेक्षा जास्त दराने मुद्रांक विकत घेऊन आपले काम भागवावे लागत आहे. मुद्रांक मिळत नसल्याने पालकांना आपल्या पाल्यांना घेऊन मुद्रांक विक्रेत्यांकडे चकरा माराव्या लागत आहेत. काही ठिकाणी विक्रेते शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून मुद्रांक देण्यास टाळाटाळ करतात. मात्र, नंतर २० ते ३० रुपये अधिक घेऊन मुद्रांक देतात.
मुद्रांक तुटवड्याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी व्ही. एस. भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी काही माहिती माझ्यापर्यंत आलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनाच तुटवड्याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. मुद्रांक विक्रीमध्ये कमी कमिशन असल्यामुळे विक्रेते ते देण्यासाठी टाळाटाळ करतात, अशी माहिती मिळाली.
केडगाव, सावेडी, भिंगार, नागापूर या उपनगरांमध्ये दररोज कोट्यवधीचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, मुद्रांकांचा तुटवडा निर्माण झाल्याने शहर परिसरातील जमिनींचे कोट्यवधींचे व्यवहार दहा दिवसांपासून ठप्प झाले आहेत. वाहन खरेदी करण्यासाठी शंभर रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता असते. मुद्रांक नसल्यामुळे वाहनांची खरेदी-विक्रीही थांबली आहे.

जास्त दराने विक्री केल्यास कारवाई
^मुद्रांक तुटवड्याची मी माहिती घेतो. जास्त दराने मुद्रांक विक्रीची तक्रार नागरिकांनी आमच्याकडे केल्यास संबंधित विक्रेत्यावर छापा टाकून चौकशी केली जाईल. तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल. त्याचबरोबर संबंधित विभागाकडून त्या विक्रेत्याचा अहवाल तयार करून पुढील कारवाई करण्यात येईल.'' व्ही.एस. भालेराव, मुद्रांक जिल्हाधिकारी.

सर्व्हर बंद पडल्याचे कारण केले पुढे
गेल्यादहा दिवसांपासून शंभर रुपयांचे मुद्रांक मिळत नसल्यामुळे विक्रेत्यांनी मुद्रांक प्रशासनाशी चर्चा केली. तहसील कार्यालयातील कोषागार विभागात शंभर रुपयांच्या मुद्रांकासाठी बसवण्यात आलेले सर्व्हर बंद झाल्यामुळे मुद्रांक शिल्लक नसल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मुद्रांकासाठी चकरा माराव्या लागत आहेत.

मुद्रांकांची विक्री त्वरित सुरळीत करा
^अनेक दिवसांपासूनच करा मारूनही शंभर रुपयांचे मुद्रांक मिळत नाहीत. त्यामुळे घर घेणाऱ्यांना विकणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक व्यवहार केवळ मुद्रांक नसल्यामुळे थांबले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने मुद्रांक विक्री सुरळीत करावी.'' इरफान जहागीरदार, बांधकाम व्यावसायिक.
बातम्या आणखी आहेत...