नगर- गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महापालिका स्थायी समिती सभापतीची निवड मंगळवारी (4 मार्च) होत आहे. या पदासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक किशोर डागवाले व अपक्ष नगरसेविका उषा ठाणगे यांची नावे चर्चेत होती. परंतु ठाणगे यांनी अर्ज दाखल न केल्याने डागवाले यांचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, शिवसेनेच्या गटातील अपक्ष नगरसेवक सचिन जाधव यांनी शेवटच्या दिवशी या पदासाठी अर्ज दाखल केला, परंतु संख्याबळानुसार डागवाले यांचे पारडे जड आहे.
मनपाची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणार्या स्थायीच्या सभापतिपदाचा घोळ सुरूच होता. स्थायी, तसेच महिला व बालकल्याण समिती सदस्यांची 15 फेब्रुवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. या निवडीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला. त्यानंतर सभापती निवडीसाठी विशेष सभेची तारीख निश्चित करण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 11 वाजता स्थायी सभापती, तर दुपारी साडेबारा वाजता महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू होईल.
स्थायी सभापतिपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता कांबळे, राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका ठाणगे व मनसेचे डागवाले यांनी अर्ज नेले होते. परंतु केवळ डागवाले यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या गटातील अपक्ष नगरसेवक सचिन जाधव यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला. त्यामुळे डागवाले व जाधव यांच्यात दुरंगी लढत होईल. स्थायीच्या संख्याबळानुसार डागवाले यांचे पारडे जड आहे. स्थायीच्या एकूण 16 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी व अपक्ष विकास आघाडी 6 काँग्रेस 3, मनसे 1, तसेच विरोधी गटात शिवसेना 4 व भाजप 2 असे संख्याबळ आहे. डागवाले यांच्या बाजूने 10, तर जाधव यांच्या बाजूने 6 सदस्य राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेच्या किशोर डागवाले यांचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महिला बालकल्याणवर शेख, शेळके बिनविरोध
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या गटातील अपक्ष नगरसेविका नसीम शेख यांनी, तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका कलावती शेळके यांनी अर्ज दाखल केला. विरोधी गटातून या पदांसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने शेख व शेळके यांच्या बिनविरोध निवडीची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.