आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा डेपोतील कामांची निविदा प्रक्रिया सुरू करा, राष्ट्रीय हरित लवादाचे महापालिकेला आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चौदाव्या वित्त आयोगाच्या साडेअकरा कोटींच्या निधीतून प्रस्तावित केलेली कचरा डेपोतील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करा, तसेच १६ मेपर्यंत या प्रक्रियेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाला बुधवारी दिले. कामांची प्रक्रिया सुरू करून येत्या सात महिन्यांत ही कामे पूर्ण करा, असे आदेशही लवादाने दिले.

लवादाने वेळोवेळी ताशेरे आेढल्यानंतर, तसेच दंड केल्यानंतर जागी झालेल्या महापालिका प्रशासन पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी उपाययोजना सुरू केल्या अाहेत. काही दिवसांपूर्वीच लवादाच्या आदेशानुसार महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ बुरूडगाव येथील शेतकऱ्यांनी बुरूडगाव कचरा डेपोची संयुक्त पाहणी केली. कचरा डेपोमुळे माेठ्या प्रमाणात प्रदूषण होत अाहे. कचरा डेपोसाठी आवश्यक असलेली संरक्षक भिंत जागाेजागी पडली असल्याचा अहवाल मागील सुनावणीत लवादासमोर सादर करण्यात आला होता. लवादाने मनपा प्रशासनाची कानउघाडणी करत कचरा डेपोतील आवश्यक कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या मनपा प्रशासन पदाधिकाऱ्यांनी या कामांसाठी चौदाव्या वित्त आयोगातून सुमारे साडेअकरा कोटींची तरतूद केली. कचरा डेपोतील प्रस्तावित कामांना तातडीने मंजुरी घेण्यासाठी विशेष महासभाही बोलावण्यात आली.

महासभेची मंजुरी घेऊन आवश्यक ती कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे मनपा प्रशासनाने बुधवारी झालेल्या सुनावणीत लवादाच्या सुनावणीत स्पष्ट केले. याचिकाकर्ते शेतकरी भाऊसाहेब कुलट जनार्दन कुलट यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. जोपर्यंत कामे होत नाहीत, तोपर्यंत डेपोत कचरा टाकू नये, अशी बाजू याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आली. त्यावर लवादाने मनपाला कचरा डेपोतील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १६ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. नंतर पाच महिन्यांत प्रस्तावित कामे पूर्ण करा, असे आदेशही लवादाने दिले. प्रस्तावित कामांसाठी अार्थिक तरतूद करून त्यांना महासभेची मंजुरी घेऊन त्याबाबतचा अहवाल लवादासमोर वेळेत सादर केल्याने मनपा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. परंतु लवादाने दिलेल्या मुदतीत कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

लढ्यास काही प्रमाणात यश
मागील काही वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. लवादाच्या दणक्यामुळे महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. आमच्या लढ्याला काही प्रमाणात यश मिळाले आहे. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. मनपाने कचरा डेपोतील कामे तातडीने पूर्ण करावीत. राधाकिसन कुलट, उपसरपंच,बुरूडगाव.
बातम्या आणखी आहेत...