नगर - मतिमंद (विशेष गरजा असलेली मुले) किंवा इतर अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांबाबतच्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नगरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सूचित तांबोळी यांची निवड झाली आहे. नगर शहरासाठी विशेष सन्मानाची बाब ठरली आहे.
डॉ. तांबोळी यांचे संशोधनात्मक काम राष्ट्रीय पातळीवर स्वीकारले गेले आहे. मतिमंद किंवा अपंग मुलांना आता सरकार विशेष गरजा असलेली मुले म्हणून ओळखली जातात. संकल्पना इयत्ता पहिली ते बारावीतील अशा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेतील सोयी सवलती देण्याबाबत मुंबईत नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या योजनेअंतर्गत या मुलांना चांगले विकसित करण्यासाठी काय करता येईल, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार, सचिव के. बी. पाटील, अवर सचिव श्रीनिवास शास्त्री, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक अरुण शिंदे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानचे समन्वयक विलास कदम, सर्व शिक्षा अभियानाचे अजय काकडे, तसेच पुणे, नाशिक मुंबईतील २० तज्ज्ञ उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. तांबोळी यांनी अध्ययन अक्षमता : ओळख उपचार, या विषयावर आपले विचार प्रेझेंटेशनद्वारे मांडले. ते प्रभावी सादरीकरण पाहून या विषयावर लगेच डॉ. तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमण्याचा निर्णय नंदकुमार यांनी जाहीर केला. या समितीचे सदस्य नेमण्याचा अधिकारही डॉ. तांबोळींना बहाल करण्यात आला.
त्यानुसार डॉ. तांबळी यांनी डॉ. आनंद पंडित. डॉ. सुजाता भान, डॉ. रोहिणी अचवल, डॉ. वर्षा भगत, डॉ. स्वाती भिसे, डॉ. प्रीती वर्मा, डॉ. काटे कुरवाला, डॉ. समीर दलवाई, डॉ. अंजना थडानी, डॉ. माधुरी कुलकर्णी यांची समितीवर निवड केली.
अपंगत्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणीकरण करण्याच्या पद्धती साधने कोणती असावीत, कोणामार्फत ते करण्यात यावे, त्याचे मापदंड काय असावेत, याबाबत ही समिती सरकारला सल्ला देणार आहे. या बाबत एक अहवालही ही समिती सरकारला देणार आहे. त्याचप्रमाणे अपंगत्वाची मानके, तसेच त्यांना सोयी सवलती या मुलांसाठी अभ्यासक्रम निश्चितीसाठी वेगळ्या दोन समित्या नेमण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. तांबोळी यांनी दिली. समाजातील या विषयातील तज्ज्ञांना काही सूचना करायच्या असल्यास त्यांनी डॉ. तांबोळी (९८२२२९४५५०) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
आता जिल्ह्यातच होणार प्रमाणीकरण
विशेषगरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणीकरणासाठी राज्य सरकारने मुंबईतील सायन हॉस्पिटल निश्चित केले आहे. यावर सर्व तज्ज्ञांनी आक्षेप नोंदवून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयात प्रमाणीकरण करण्याची गरज व्यक्त केली. आता डॉ. तांबोळी यांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करणार आहे.