आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य नाट्य स्पर्धा : पाठांतर नसल्याने दिग्दर्शकाचीच उडाली तारांबळ....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेची सुरुवात नगर येथील जिप्सी प्रतिष्ठानच्या "शेवंता जित्ती हाय' या नाटकाने झाली. प्रल्हाद जाधव यांनी लिहिलेली ही संहिता जुनी असली तरी रंगकर्मींना ती नेहमीच खुणावत आली आहे. स्पर्धेसाठी हा असलेला साचेबंदपणा ही संहिता पूर्ण करते. अवाढव्य नेपथ्य, भारंभार पात्रे, तांत्रिक कसरती नसणारे स्त्री पात्र विरहित हे नाटक प्रेक्षकांना धरून ठेवण्यात यशस्वी ठरते. तेच या नाटकाचे बलस्थान आहे.

हे नाटक पाहताना सामना या चित्रपटाची आठवण होते. या चित्रपटात "नामदेव कांबळेचं काय झालं?' या वाक्याभोवती कथासूत्र फिरते. नाटकाची मध्यवर्ती कल्पनाही त्याच अंगाने जाते.
"शेवंता जित्ती हाय' हे रेल्वेच्या संडासात लिहिलेले वाक्य कुणी सामान्य माणूस वाचतो आणि व्यवस्थेशी झगडून सत्य उजेडात आणतो, असा काहीसा कथाभाग या नाटकाचा आहे. यातील पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका दिग्दर्शक शशिकांत नजान यांनी साकारली. दिग्दर्शन व भूमिका या दुहेरी जबाबदारीमुळे असेल कदाचित त्यांचे भूमिकेकडे दुर्लक्ष झाले. पाठांतराअभावी त्यांना अगदी चष्मा लावून वाक्य पाहण्याबरोबरच पोलिस झालेल्या भिसेंना टच देण्यापर्यंत सर्व कसरती कराव्या लागल्या.

सामान्य माणसाची भूमिका केलेले श्रेणिक शिंगवी यांनी बारकाव्यांसह भूमिकेला न्याय दिला. चोख पाठांतर असल्याने ते रंगमंचावर आत्मविश्वासाने वावरले. खंडेभराड पाटलाची भूमिका प्रशांत कांबळे यांनी साकारली. संवादफेकीमुळे ते मद्यसम्राट वाटले, पण डोळ्यांना भासले नाहीत. भूमिकेची गरज म्हणून त्यांनी वेशभूषेकडे लक्ष द्यायला हवे होते.

राहुल भिंगारदिवे यांनी संगीताची व स्वप्निल नजान यांनी प्रकाश योजनेची जबाबदारी बऱ्यापैकी पार पाडली. नाटकाच्या सुरूवातीला रेल्वेच्या आवाजाची पुनरावृत्ती केली नसती, तर नाटकाला पोषक ठरली असती. पोलिस स्टेशनला साजेसे नेपथ्य होते, मात्र कोठडीचा दरवाजा थोडा मोठा असता, तर पात्रांचा वावर सहज झाला असता.

सत्यशोधन करताना या नाटकाचा शेवट मृत्यूंजय मंत्राने करून नाटकाच्या आशयाला विनाकारण गूढ आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवले असे वाटत राहिले. एकूण प्रयोग बरा झाला, असे म्हणायला हरकत नाही...- बाळासाहेब चव्हाण