आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारी कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी खोंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या अध्यक्षपदी येथील योगिराज खोंडे यांची बिनविरोध निवड झाली. गेली १४ वर्षे ते या पदावर असून पुढील वर्षांसाठी त्यांची फेरनिवड झाली. संघटनेच्या औरंगाबाद येथे झालेल्या अधिवेशनात त्यांची निवड झाली.
संघटनेच्या सरचिटणीसपदाची गेली ५२ वर्षे जबाबदारी सांभाळणारे र. ग. कर्णिक यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी निवृत्ती घेतल्याने त्यांच्याजागी सुनील जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. सन २००० पासून संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी खोंडे समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास टाकत पुढील वर्षांसाठी त्यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. तत्पूर्वी संघटनेचे राज्य सहचिटणीस म्हणूनही २२ वर्षे त्यांनी काम केले आहे.
औरंगाबाद येथे झालेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले.
राज्यभरातून आलेले २१०० कर्मचारी या अधिवेशनात सहभागी झाले. त्यात नगर जिल्ह्यातील १०४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अधिवेशनात विविध ठराव मंजूर करण्यात आले. अंशदायी निवृत्तीवेतन योजना रद्द करावी, ५० टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करावा, केंद्राप्रमाणे टक्के महागाई भत्ता मंजूर करावा, सातव्या वेतन आयोगाची अर्थसंकल्पात आगाऊ तरतूद करावी, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे, ४० टक्के रिक्त पदे तातडीने भरावीत, खासगीकरण कंत्राटीकरणाला विरोध आदी ठरावांचा त्यात समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप झाला. प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दानवे यांनी दिल्याची माहिती संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख श्रीकांत शिर्षीकर यांनी दिली.