आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Government Frigthening Anna Hazare\'s Fast

...तर पाणीही पिणार नाही- अण्णा हजारेंचा इशारा, मनधरणीसाठी थोरात राळेगणसिध्‍दीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राळेगणसिद्धी - जनलोकपाल विधेयक चालू अधिवेशनातच मंजूर करावे, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू करताच पहिल्याच दिवशी राज्य सरकार हादरले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अण्णांच्या मनधरणीसाठी दूत म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवले, मात्र आधी जनलोकपाल मंजूर करा, मगच चर्चा करू, अशी ठाम भूमिका अण्णांनी घेतल्याने त्यांचा निरुपाय झाला.
मंगळवारी सकाळी भाषण करून अण्णांनी उपोषण सुरू केले. केंद्र व राज्य सरकारने उपोषणाची गंभीर दखल घेतली. महसूलमंत्री थोरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आले. तेव्हा अण्णांची पत्रकार परिषद सुरू होती. थोरात आल्यानंतर थेट यादवबाबा मंदिरात गेले. तेथे त्यांना प्रतीक्षा करावी लागली. पत्रकार परिषद उरकल्यावर अण्णाही मंदिरात गेले. तेथे बंद खोलीत थोरात व आमदार सुधीर तांबे यांच्याबरोबर चर्चा झाली. अध्र्या तासानंतर बाहेर आलेल्या थोरात यांनी, अण्णांची प्रकृती पहिल्यासारखी राहिली नाही, त्यामुळे त्यांनी उपोषण करू नये, अशी मुख्यमंत्र्यांतर्फे विनंती करण्यासाठी आल्याचे सांगितले. नंतर काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, संसदीय कार्यमंत्री नारायण सामी यांनी लोकपाल या अधिवेशनात मंजूर केले जाईल, असे जाहीर केल्याची वार्ता येथे धडकली.
दरम्यान, केजरीवाल यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे का, यावर अण्णा म्हणाले, त्यांना कोणी फोन केलेला नाही. ते वेगळ्याच गडबडीत आहेत.
याआधी सोळा वेळा उपोषण केले. सहा कायदे करायला सरकारला भाग पाडले, त्यावेळी एकटाच होतो. त्यावेळी आम आदमी पक्षाचे लोक थोडेच बरोबर होते. मला कोणाचीही गरज नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
थोरातांशी मंदिरात बंद खोलीत चर्चा
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अण्णांची तपासणी केली. त्यांची प्रकृती उपोषणासाठी योग्य नसल्याचा अहवाल मिळताच मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून थोरात आले. त्यांनी यादवबाबा मंदिरातील बंद खोलीत 20 मिनिटे चर्चा करून अण्णांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, अण्णा निर्णयावर ठाम राहिले.
* आधी जनलोकपाल विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात मंजूर करा, मगच उपोषण सोडू. कोणाच्याही आश्वासनावर उपोषण सोडणार नाही. पंतप्रधानांनी स्वत: लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही जनलोकपाल मंजूर करू, अशी 15-16 पत्रे त्यांच्याकडून मिळाली आहेत. त्यात आश्वासनेच आहेत. आता कोणावरच विश्वास राहिला नसल्याने काहीही झाले तरी जनलोकपाल मंजूर झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे अण्णांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.
* फक्त राज्यसभेत चर्चा बाकी आहे. त्यास किती वेळ लागणार आहे? मध्येच उपोषण मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे अण्णा म्हणाले.
* राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हरियाणातही पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे सरकारला विधेयक मंजूर करावेच लागेल, असे ते म्हणाले.
* राळेगणसिद्धीत या वेळी कार्यकर्त्यांची गर्दी का कमी आहे, असा प्रश्न विचारला तेव्हा अण्णांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले. ‘गर्दीपेक्षा दर्दीं’ची गरज आहे. येथे सर्व दर्दी लोक असल्याचे ते म्हणाले. किरण बेदी आज येणार
दिल्ली आंदोलनातील विश्वंभर चौधरी वगळता एकही सहकारी अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाला नसल्याची चर्चा असतानाच निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी बुधवारी दुपारी राळेगणमध्ये येऊन अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्या सकाळी विमानाने पुण्याला येऊन तेथून मोटारीने दुपारी राळेगणला येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.
पुन्हा आश्वासन
मंत्री थोरात अण्णांकडे जनलोकपाल मंजूर केले जाईल असे आश्वासनच घेऊन आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण अण्णांनी या वेळी मात्र आश्वासने खूप झाली, आता कोणाच्याही आश्वासनावर विश्वास ठेवणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे सांगण्यात आले.
कट कराल तर पाणीही सोडून देईन : अण्णा
आपली प्रकृती चांगली नसल्याचे कारण दाखवून येथून उठवण्याचा कट सरकारने केल्याची माहिती आपल्याला समजल्याचे अण्णांनी पत्रकारांना सांगितले. हे जर खरे असेल तर यापुढे पाणीही पिणेदेखील सोडून देईन, असा इशाराही त्यांनी दिला. किमान चार दिवस तरी आपल्या प्रकृतीला काहीही होणार नसल्याचे अण्णांनी ठणकावून सांगितले. सरकारी डॉक्टरांमार्फत तपासणीलाही अण्णांनी विरोध केला.