आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डायल १०८ सेवा ठरते अनेकांसाठी "संजीवनी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अपघात, दुर्घटना झाली किंवा गंभीर आजार उदभवल्यास रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी (२१ मार्च) केंद्र व राज्य सरकार आणि भारत विकास ग्रूपच्या (बीव्हीजी) संयुक्त विद्यमाने डायल १०८ ही टोल फ्री क्रमांक असलेली रुग्णवाहिका सेवा सुविधा सुरू झाली. या अंतर्गत आतापर्यंत रस्ते अपघात, आपत्कालीन प्रसूती, हृदयविकार, मेडिकल इमर्जन्सी अशा एकूण ३ हजार ७९९ रुग्णांना वाचवण्यात आले. त्यामुळे ही सेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरली आहे.
अपघात झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाल्यास जीवितहानी कमी करण्यास मोठी मदत मिळते. अपघात झाल्यानंतर सुरुवातीची २० मिनिटे महत्त्वाची असतात, हे लक्षात घेऊन व्हेंटिलेटर, डी-फेब्रिलेटर कम मॉनिटर, इलेक्ट्रिक सक्शन, सिरींज पंप, स्ट्रेचर, महत्त्वाची औषधे, डिलिव्हरी किट, ग्लुकोमीटर, व्हिलचेअर आदी ४२ अद्ययावत उपकरणे असलेली रुग्णवाहिका तयार करण्यात आली आहे. अपघातच नव्हे, तर गंभीर आजार उद्भवल्यास रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाइकाने १०८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती दिल्यास २० ते ३० मिनिटांत रुग्णवाहिका डॉक्टरांसह घटनास्थळी दाखल होते. रुग्णावर त्याच ठिकाणी उपचार केले जातात. गरज पडल्यास रुग्णाला सरकारी किंवा रुग्णाच्या सल्ल्यानुसार खासगी रुग्णालयात दाखल केले जाते.
रुग्णवाहिकेत तीन डॉक्टर व दोन चालक असे पाचजणांचे पथक असते. एक डॉक्टर आठ तास, तर चालक प्रत्येकी बारा तास कार्यरत असतात. जिल्ह्याचे भौगोलिक स्थान विचारात घेऊन लवकरात लवकर रुग्णांना या सेवेचा लाभ व्हावा, यासाठी पुणे, सोलापूर, जामखेड, मनमाड रस्त्यावर या रुग्णवाहिकांची स्थाने निश्चित केली आहेत. या सेवेंतर्गत जिल्ह्यात १२० डॉक्टरांची नियुक्ती असून ४० रुग्णवाहिका आहेत. तीस किलोमीटरवर एक रुग्णावाहिका उपलब्ध आहे, असे जिल्हा व्यवस्थापक डॉ. समीर सय्यद यांनी सांगितले.
काहीजणांकडून होतो दुरुपयोग...
या सेवेचा काही वेळेस नागरिकांकडून दुरुपयोग करण्यात येतो. ग्रामीण भागातून एकाला तालुक्याच्या ठिकाणी यायचे होते. रात्र झाल्याने कोणतेही वाहन मिळत नव्हते. त्याने १०८ डायल करून पोट दुखत असल्याचे कारण सांगून अ‍ॅम्बुलन्स मागवली. डॉक्टरांनी त्यास तपासले असता तो ठणठणीत होता.
अशी होते प्रक्रिया
रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाइकाने टोल फ्री १०८ हा नंबर डायल केल्यास तो पुणे येथील औंध चेस्ट हॉस्पिटलच्या कॉल सेंटरला जाऊन तेथून रुग्णाचे नाव, घटनास्थळ आदींची माहिती घेतली जाते. तेथून संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व चालकाला घटनेची माहिती दिली जाते. त्यानंतर अवघ्या २० ते ३० मिनिटांत ही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून रुग्णाला जवळच्या रुग्णालयात आणते.
यासाठी मिळते रुग्णवाहिका
रस्ता अपघात, आपत्कालीन प्रसूती, नवजात बालकांसंदर्भात आजार, साथींचे आजार, नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप), मानवनिर्मित आपत्ती (दंगल, गॅसगळती, आग), अत्यवस्थ हृदयविकार, सर्पदंश, अन्न विषबाधा, भाजलेले रुग्ण, श्वसन संस्थेचे आजार, मेंदूचे आजार.